पॅरिस : माजी विजेत्यांसह आघाडीच्या मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यंदा महिला एकेरीत आठवी मानांकित रशियाची मीरा आंद्रीवा आणि बिगरमानांकित पोलंडची माया च्वालिन्स्का यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. या दोघीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत.

आंद्रीवाने यंदाच्या हंगामातील सातत्य कायम ठेवताना गुरुवारी झालेल्या उपांत्य लढतीत १५व्या मानांकित युक्रेनच्या मार्ता कोस्च्युकचा ६-१, ६-३ असा अवघ्या ७६ मिनिटांत पराभव केला. दुसर्‍या उपांत्य लढतीत च्वालिन्स्काने डायना श्नायडरचे आव्हान ७-६

(७-४), ६-४ असे परतवून लावले. श्नायडरने उपांत्यपूर्व लढतीत अग्रमानांकित अरिना सबालेन्काला पराभवाचा धक्का दिला होता.

फ्रेंच स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी

१९ वर्षीय आंद्रीवा तिसरी युवा टेनिसपटू ठरली. रशिया-युक्रेन संघर्षाचे पडसाद उपांत्य लढतीवरही उमटले. कोस्च्युकने लढतीनंतर आंद्रीवाशी हस्तांदोलन करण्यास आणि तिच्यासह छायाचित्र काढण्यास नकार दिला.

सिन्नेरच्या अपयशानंतरही पुरुषांत इटलीचे वर्चस्व

* फ्लाव्हिओ कोबोली आणि माटेओ अर्नाल्डी या इटलीच्या खेळाडूंमध्येच यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य लढत रंगणार आहे. त्यामुळे यानिक सिन्नेरच्या अपयशानंतरही इटलीचा एक खेळाडू अंतिम लढत खेळणार हे निश्चित आहे.

* पुरुष एकेरीतील दुसर्‍या उपांत्य लढतीत दुसरा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि २६व्या क्रमांकाचा याकुब मेन्सिक समोरासमोर येतील.

* कोबोली आणि अर्नाल्डी या इटलीच्या दोन्ही खेळाडूंनी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. ’ उपांत्यपूर्व फेरीत कोबोलीने फेलिक्स ऑगर-ॲलिसिमेचा ४-६, ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. * दुसरी उपांत्यपूर्व लढत माटेओ बेरेट्टिनी आणि अर्नाल्डी या इटलीच्याच खेळाडूंमध्ये झाली. बेरेट्टिनीने दुखापतीमुळे दुसर्‍या सेटमध्ये माघार घेतल्याने अर्नाल्डीला पुढे चाल मिळाली.