पॅरिस : रशियाच्या १९ वर्षीय मीरा आंद्रीवाने फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची गेल्या तीन दशकांतील सर्वांत युवा विजेती होण्याचा मान मिळवला आहे. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत आंद्रीवाने बिगरमानांकित पोलंडच्या माया च्वालिन्स्काचा ६-३, ६-२ असा पराभव सहज केला.

पात्रता फेरीपासून सलग नऊ सामने जिंकून च्वालिन्स्काने विजेतेपदाच्या लढतीपर्यंत मजल मारली होती. मात्र, निर्णायक लढतीत ती गुणवत्तेला न्याय देऊ शकली नाही. पोलंडच्या असंख्य चाहत्यांचा तिला पाठिंबा मिळत होता. कोर्टवर ‘माया…माया…’ नावाचा जयघोष होता. मात्र, यातून प्रेरणा घेण्यापेक्षा च्वालिन्स्का अधिक दडपणाखाली गेली आणि अधिक अचूक खेळ करणार्‍या आंद्रीवाने बाजी मारली.

पहिल्या सेटची सुरुवात अत्यंत तणावपूर्ण झाली. ग्रँडस्लॅम स्पर्धेची पहिलीच अंतिम लढत खेळण्याचे दडपण दोघींच्या खेळावर जाणवत होते. सामन्यात स्थिरावण्यासाठी दोघींनी वेळ घेतला. मात्र, त्यानंतर आंद्रीवाने आपल्या ताकदवान फोरहँड फटक्याचा वापर करून निर्विवाद वर्चस्व राखले. पहिल्या सेटच्या २-३ अशा स्थितीतून आंद्रीवाने लढतीवर मिळवलेली पकड अखेरपर्यंत सोडली नाही. सलग चार गेम जिंकत तिने पहिला सेट जिंकला.

त्यानंतर दुसर्‍या सेटला सलग पाच गेम जिंकून तिने ५-० अशी निर्णायक आघाडी घेतली. तेव्हा सलग नऊ गेम गमाविल्यानंतर च्वालिन्स्काला स्व्हिहस राखून गेम जिंकता आला. अखेरच्या स्व्हिहसला आंद्रीवा प्रथमच अडखळलेली वाटली. तिला ही विजयी स्व्हिहस गमवावी लागली. पण, वेळीच नियंत्रण राखत तिने तिसर्‍यांदा च्वालिन्स्काची स्व्हिहस भेदली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘‘लहानपणापासून प्रत्येक टेनिस स्पर्धा बघत मोठी झाले. फ्रेंच स्पर्धा विशेष आवडती होती. ती जिंकण्याचे माझे मोठे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे,’’ असे आंद्रीवा म्हणाली. प्रतिस्पर्धी च्वालिन्स्काच्या खेळाचेही कौतुक करताना तिने ‘‘तू खूप चांगली खेळतेस. तुझा खेळ आव्हानात्मक आहे आणि आपल्याला अजून खूप अंतिम लढती खेळायच्या आहेत,’’ असे आंद्रीवा म्हणाली.

१ फ्रेंच स्पर्धा जिंकणारी १९९२ नंतरची पहिलीच युवा टेनिसपटू. तेव्हा मोनिका सेलेसने १८व्या वर्षी (एकूण तिसर्‍यांदा) स्पर्धा जिंकली होती.