पाकिस्तान क्रिकेटची ओळख असलेला अगम्य गोंधळ मंगळवारीही सुरूच आहे. निवड समिती सदस्य आणि माजी कर्णधार मिसबाह उल हक यांनी निवडसमितीपदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघापैकी ७ खेळाडूंना मायदेशी पाठवण्यात आलं आहे. मुख्य प्रशिक्षक सर्फराझ अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही रिलीज करण्यात आलं आहे. वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षक माईक हेसन आणि अॅशले नॉफक यांच्याकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप मिसबाहचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. मिसबाहने लाहोरस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचे फलंदाजी सल्लागार पदाचाही राजीनामा दिला आहे.

इंग्लंड दौऱ्यातल्या हेडिंग्ले आणि लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. मोहम्मद अब्बास, सौद शकील आणि अब्दुल्ला शफीक यांचा अपवाद वगळता बाकी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी कामगिरी करता आली नाही. या दोन पराभवांनी नाराज बोर्डाने निम्म्या संघाला मायदेशी पाठवलं आहे. त्यांच्या जागी पाच नव्या दमाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षकांनाही किंमत चुकवावी लागली आहे.

पाकिस्तानचा कसोटी प्रकारातला सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या मिसबाहने २०१७ मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात विविध भूमिकांमध्ये काम केलं. २०१९ मध्ये मुख्य प्रशिक्षक आणि निवडसमिती प्रमुख म्हणून त्याने काम केलं. प्रशिक्षणाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यााठी मिसबाहने निवडसमिती प्रमुखपदाचा राजीनामा दिला.

दोन वर्षांनंतर अॅडहॉक कमिटीने सल्लागार म्हणून त्याची नियु्क्ती केली. कमिटीतर्फे नियु्क्त पाच मेन्टॉरपैकी तो एक होता. महिला संघालाही त्याचं मार्गदर्शन लाभलं. डोमेस्टिक स्पर्धेत ५० षटकांच्या स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तान गोल्ड संघाचा तो प्रशिक्षक होता.

यंदाच्या वर्षी चारसदस्यीय निवडसमितीची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये मिसबाहसह आकीब जावेद, सर्फराझ अहमद, असाद शफीक यांचा समावेश आहे. वर्षातील १८० दिवस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे फलंदाजी सल्लागार म्हणूनही मिसबाह काम करतो.