चेंडू खेळून झाल्यावर काही फलंदाज बाजूला होतात तर काही फलंदाज मागे फिरतात, हे सारे साहजिक होणारे असले तरी विजयाच्या गुर्मीत असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याला यामध्ये काहीतरी काळेबेरे वाटत आहे. इंग्लंडच्या फलंदाजांची ही अयोग्य रणनीती असल्याचे जॉन्सनला वाटते.
चौथ्या सामन्यामध्ये जॉन्सनचा चेंडू खेळून झाल्यावर इंग्लंडचा केव्हिन पीटरसन मागे फिरला, त्या वेळी जॉन्सनने त्याच्या दिशेने चेंडू फेकला. यामध्ये जॉन्सनची अरेरावी दिसत असली तरी ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’ असेच चित्र आहे.
‘‘ इंग्लंडच्या फलंदाजांनी पाठ दाखवण्याची अयोग्य रणनीती आखली आहे. हा प्रकार होत असताना मला राग येतो. पीटरसनच्या दिशेने चेंडू मारणे अयोग्य होते, पण ते वगळता बाकीचे योग्य असेच आहे. त्यांनी हे कृत्य यापुढे करू नये,’’ अशी ताकीद जॉन्सनने इंग्लंडच्या फलंदाजांना दिली आहे.