Mitchell Marsh Record In The Hundred League: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ‘द हंड्रेड’ लीग स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा कर्णधार मिचेल मार्शची बॅट चांगलीच तळपली आहे. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. आता आणखी एक दमदार खेळी करुन त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स लीड्स आणि मँचेस्टर सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना रंगला. या सामन्यात फलंदाजी करताना मिचेल मार्शने २३ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने द हंड्रेड २०२६ स्पर्धेत ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह मिचेल मार्श हा द हंड्रेड लीग स्पर्धेतील एकाच हंगामात ४०० हून अधिक धावा करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.
मँचेस्टर सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो मोठी खेळी करु शकला नाही, पण वेगवान ३२ धावांच्या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. यादरम्यान त्याने ४०६ धावांपर्यंत मजल मारली. यासह द हंड्रेड स्पर्धेतील एकाच हंगामात ४०० धावांचा पल्ला गाठणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या जेम्स विंसने २०२४ मध्ये साऊदर्न ब्रेव संघासाठी खेळताना १० सामन्यांमध्ये ४२४ धावा केल्या होत्या. आता मिचेल मार्शकडे हा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे. यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. मिचेल मार्श हा द हंड्रेड स्पर्धेतील एकाच हंगामात ४०० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच परदेशी फलंदाज ठरला आहे.
द हंड्रेड लीग स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
जेम्स विंग – ४२४ धावा (२०२४)
मिचेल मार्श- ४०६ धावा (२०२६)
जोस बटलर – ३९१ धावा ( २०२३)
डेव्हिड मलान – ३७७ धावा (२०२२)
जॉर्डन कॉक्स- ३६७ धावा (२०२५)
फिल सॉल्ट -३५३ धावा (२०२२)
मिचेल मार्शने या हंगामात फलंदाजी करताना षटकारांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने षटकारांचा मोठा रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केला आहे. मिचेल मार्श टी-२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. मार्शे २०२६ मध्ये आतापर्यंत ९४ षटकार खेचले आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने टिम डेव्हिडची बरोबरी केली आहे. टिम डेव्हिडने २०२५ मध्ये ९४ षटकार खेचले होते. तर २०२२ मध्येही टिम डेव्हिडने सर्वाधिक ९३ षटकार खेचले होते. तर ट्रॅव्हिस हेडने २०२४ मध्ये ८३ आणि मिचेल ओव्हनने २०२५ मध्ये ८२ षटकार खेचले होते.
