IPL 2026 Mitchell Marsh Six on Bhuvneshwar Kumar Bowling: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील सामन्यात आयपीएल २०२६ मधील सर्वात लांब षटकारांपैकी एक पाहायला मिळाला. लखनौचा सलामीवीर मिचेल मार्शने एम.ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एक गगनचुंबी षटकार खेचला. मार्शने षटकारासाठी मारलेला चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
आरसीबीने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत लखनौला फलंदाजीसाठी पाचारण केलं. लखनौची सुरूवात चांगली झाली, पण मारक्रम १२ धावा करत बाद झाला. यानंतर मिचेल मार्श ३२ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करत बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने दणदणीत षटकार खेचला. आयुष बदोनीने ३८ धावांची तर मुकुल चौधरी याने ३९ धावांची खेळी केली. याशिवाय लखनौचे इतर सर्व खेळाडू फेल ठरले. यासह संघाने प्रथम फलंदाजी करताना १४६ धावा केल्या.
तिसऱ्या षटकात मिचेल मार्शने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एक गगनचुंबी षटकार मारला. त्याने भुवनेश्वर कुमारच्या शॉर्ट चेंडूवर ऑनसाईडच्या दिशेने एक जोरदार पुल शॉट खेळला आणि चेंडू स्टेडियमच्या छतावरून जाऊन पडला. मिचेल मार्शचा हा षटकार १०२ मीटरचा होता. तो शॉट इतका जोरदार होता की संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. हा षटकार आयपीएल २०२६ च्या या हंगामातील तिसरा सर्वात लांब षटकार ठरला.
आयपीएल २०२६ मधील सर्वात लांब षटकार सध्या टीम डेव्हिडच्या नावावर आहे. त्याने याच मैदानावर १०६ मीटरचा षटकार मारला होता. या यादीत कूपर कॉनॉलीचा १०३ मीटरचा षटकार तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे लांब षटकार अनेकदा चिन्नास्वामी स्टेडियमच्या लहान बाऊंड्री आणि फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर पाहायला मिळतात, पण १०२ मीटरचा षटकार मैदानापलीकडे पाठवण्यासाठी पुरेसा आहे.
लखनौ सुपर जायंट्सची सामन्याची सुरुवात अडखळत झाली. मात्र, मिचेल मार्शने ३२ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह महत्त्वपूर्ण ४० धावा करून डाव सावरला. पण, कृणाल पंड्याच्या एका अप्रतिम चेंडूमुळे त्याचं अर्धशतक हुकलं. तो पंड्याच्या चेंडूवर फसला आणि क्लीन बोल्ड झाला.
