Mitchell Marsh Hundred In LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शने शतकी खेळी साकारली. त्याने लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमध्ये सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार सुरूवात करत गोलंदाजांना बॅकफूटवर ठेवलं. आयपीएलमधील हे त्याचे दुसरे शतक आहे. मिचेल मार्शने गेल्या हंगामातही लखनौ संघासाठी आपलं पहिले आयपीएल शतक झळकावलं होतं.

लखनौमध्ये होत असलेल्या सामन्यात सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. १४ षटकांनंतर आता तिसऱ्यांदा पावसामुळे सामना थांबला आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत लखनौला फलंदाजीसाठी पाचारण केलं. सलामीला उतरलेल्या मिचेल मार्श व अर्शीन कुलकर्णीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान वादळी फटकेबाजी करणाऱ्या मार्शने शतकी खेळी साकारली.

मिचेल मार्शने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. त्याने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं, जे आयपीएलमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूने केलेलं सर्वात जलद शतक आहे. शतक पूर्ण करताना त्याने नऊ चौकार आणि आठ षटकार मारले; त्याच्या या वादळी खेळीने आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला हतबल केलं. मिचेल मार्श यासह लखनौ सुपर जायंटस संघासाठी सर्वात जलद शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

मिचेल मार्शच्या शतकासह लखनौ सुपर जायंट्स संघाने १४ षटकांत १ बाद १४५ धावा केल्या आहेत. १४ षटकं पूर्ण होताच पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सध्या सामना थांबलेला आहे. मिचेल मार्श १०७ धावांवर तर निकोलस पुरन १४ धावांवर खेळत आहे. या कमालीच्या सुरूवातीनंतर आता लखनौचा संघ किती धावांचा डोंगर उभारणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.