लखनौ सुपरजायंट्ससाठी सलग दोन महिने खेळणाऱ्या मिचेल मार्शने बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेतूनही माघार घेतली आहे. क्लब की देश हा वाद आता सातत्याने ऐरणीवर येतो आहे. वेस्ट इंडिजपाठोपाठ न्यूझीलंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी फ्रीलान्स पद्धतीने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील टी२० लीगमध्ये ते खेळतात. बोर्डाशी करारबद्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना प्रत्येक मालिकेसाठी उपलब्ध असणं अनिवार्य नाही. कोणत्या मालिकेत खेळणार याचा निर्णय ते बोर्डाला कळवतात. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन यानेही बोर्डाचा करार न स्वीकारता फ्रीलान्स पद्धतीने खेळत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मिचेल मार्शला कारकिर्दीत दुखापतींनी सातत्याने सतवलं आहे. कारकिर्दीत तो जेवढे सामने खेळला आहे त्याच्यापेक्षा चौपट सामन्यात तो खेळू शकलेला नाही. दुखापतींमुळे मार्शच्या उपलब्धेतविषयी नेहमीच साशंकता असते. यंदाच्या हंगामात त्याने १४ पैकी १३ सामने खेळले. दुखापतीमुळे प्राथमिक फेरीच्या शेवटच्या सामन्यात तो खेळू शकला नाही. आयपीएल सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाला. मार्शकडे टी२० संघाची धुरा होती. मात्र दुखापतीतून न सावरल्याने त्याच्याऐवजी जोश इंगलिसकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं.

पॅट कमिन्स टेस्ट तसंच वनडे प्रकारात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. दुखापतींची शक्यता आणि वर्कलोड मॅनेजमेंट यामुळे कमिन्स अनेकदा वनडे मालिकांमध्ये खेळत नाही. अशावेळी अन्य खेळाडूंपैकी कोणाकडे कर्णधारपद सोपवण्यात येतं. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा टी२० कर्णधार आहे. मात्र दुखापतीमुळे तो अनेकदा खेळू शकत नाही. पाकिस्तान दौऱ्यात एकही सामना खेळू न शकलेला मार्श आता बांगलादेशात वनडे मालिकेतही खेळू शकणार नाही.

लखनौ सुपरजायंट्स साठी खेळताना फिट असलेला खेळाडू देशासाठी खेळताना अनफिट होतो हे चित्र आता नियमित होत चाललं आहे.

दरम्यान ट्रॅव्हिस हेडला बांगलादेश दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. हेडने वैयक्तिक कारणास्तव सुट्टीसाठी विनंती केली होती. तन्वीर संघा पाकिस्तानमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तोही बांगलादेश दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी टॉड मर्फीची निवड करण्यात आली आहे. हेड आणि मार्श नसल्याने मॅट शॉर्ट आणि ऑलिव्हर पीक यांना संघात कायम राखण्यात आलं आहे.

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत असल्यामुळे हेडची पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र बांगलादेश दौऱ्यासाठी त्याचं नाव संघात होतं. मात्र आता तो नसेल.

मार्शच्या अनुपस्थितीत जोश इंगलिसकडेच संघाची सूत्रं असतील. टी२० मालिकेसाठीही मार्श फिट होऊ शकला नाही तर तेव्हाही इंगलिसकडेच धुरा सोपवली जाईल.

बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
झेव्हियर बार्टलेट, अ‍ॅलेक्स कॅरे, कूपर कॉनली, बेन ड्वारशियास, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश इंगलिस, मॅथ्यू कुन्हेमन, मार्नस लबूशेन, टॉड मर्फी, ऑलिव्हर पीक, मॅथ्यू रेनशॉ, लायम स्कॉट, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झंपा.

बांगलादेश दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श, झेव्हियर बार्टलेट, कूपर कॉनली, टीम डेव्हिड, जोएल डेव्हिस, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, आरोन हार्डी, जोश इंगलिस, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुन्हेमन, रिले मेरडिथ, जोश फिलीप, मॅथ्यू रेनशॉ, अ‍ॅडम झंपा