Mitchell Starc Funny Reaction to Alyssa Healy Ranking Video: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने त्याची पत्नी अ‍ॅलिसा हिली हिने एलिट गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा जसप्रीत बुमराह याला त्याच्यापेक्षा वर स्थान दिल्यानंतर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मिचेल स्टार्कची पत्नी व ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार व यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर सध्या ती क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

अ‍ॅलिसा हिलीने जगातील पाच महान गोलंदाजांची यादी तयार केली होती. या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न अव्वल स्थानावर होता. त्यानंतर जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्ग्रा यांना स्थान देण्यात आलं, तर स्टार्कला पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आलं. हिलीच्या या क्रमवारीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. मात्र स्टार्कने नेहमीच्या शांत स्वभावाप्रमाणे प्रतिक्रिया दिली. पण स्टार्कने या पोस्टवर कमेंट केल्याने ही पोस्ट सध्या व्हायरल आहे. त्याची ही सहज प्रतिक्रिया चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली.

फॉक्स क्रिकेट या इन्स्टाग्राम पेजवर एलिसा हिलीचा व्हीडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये तिला ब्लाइंड रँकिंग पद्धतीने जगातील एलिट गोलंदाजांना क्रमांक द्यायला सांगण्यात आलं होतं. पहिलं नाव तिला शेन वॉर्न देण्यात आलं. वॉर्नला तिने पहिल्या स्थानी ठेवलं. दुसरं नाव जसप्रीत बुमराह होतं. बुमराहला तिने तिसऱ्या स्थानी ठेवलं. यानंतर मिचेल स्टार्कच नाव आलं, तिने स्टार्कला पाचव्या स्थानी ठेवलं. हे ऐकून अँकरदेखील हसू लागला. त्यानंतर ग्लेन मॅकग्राच नाव घेण्यात आलं. मॅकग्राला चौथ्या स्थानी तर पॅट कमिन्सला दुसऱ्या स्थानी ठेवण्यात आलं.

पत्नीने दिलेल्या या क्रमवारीवर स्टार्कने अगदी साध्या आणि विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली. त्याने कमेंटमध्ये फक्त “No worries” “काही हरकत नाही” असं लिहिलं. त्याची ही साधी प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्यांना खूपच आवडली. स्टार्कच्या या सहज प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर चर्चेला आणखी रंग चढला. विशेष म्हणजे, अ‍ॅलिसा हिलीने आपल्या पतीलाच इतर तीन गोलंदाजांपेक्षा खाली स्थान दिलं, त्यामुळे या प्रसंगात आणखी विनोदाची भर पडली आणि चाहत्यांनीही त्याचा मनमुराद आनंद घेतला.

मिचेल स्टार्क आणि अ‍ॅलिसा हीली हे क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पॉवर कपल्सपैकी एक मानलं जातं. मैदानाबाहेरील त्यांचं खेळकर आणि मोकळं नातं चाहत्यांना नेहमीच पाहायला मिळतं. दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत यशस्वी क्रिकेटपटू असले, तरी सोशल मीडियावर ते अनेकदा हलक्या-फुलक्या टोमण्यांत, विनोदांत आणि एकमेकांची मजा करण्यात रमलेले दिसतात.