Mitchell Starc Mehidy Hasan Miraz Heated Clash Darwin Test: बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाची कसोटीत घरच्या मैदानावर अवस्था बिकट केली आहे. पहिल्या कसोटीत सध्या बांगलादेश संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी बांगलादेशला १९८ धावांवर सर्वबाद करत कमालीची सुरूवात केली. यानंतर बांगलादेशने दुसरा संपूर्ण दिवस खेळून काढला आणि दुसऱ्या दिवसाअखेरीस बांगलादेशने १५३ धावांची आघाडी घेतली आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क व बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराज यांच्यात मैदानावर बाचाबाची झाली.

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात डार्विनमधील मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस वातावरण तापलं. बांगलादेशच्या डावात मिचेल स्टार्क त्याच्या स्पेलमधील २१वं षटक टाकण्यासाठी आला होता. यादरम्यान दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता, तर मेहदी हसन मिराज स्ट्राईकवर होता.

मिचेल स्टार्क-मेहदी हसन मिराज यांच्यात कशावरून झाला वाद?

मेहदी हसन मिराजने चेंडू सरळ खेळत एक धाव घेतली, पण धावताना तो चुकून खेळपट्टीच्या मधोमध गेला. स्टार्कच्या फॉलो-थ्रूमुळे त्याला उजव्या बाजूने धावण्याची संधी मिळाली नाही. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. स्टार्क संतापलेल्या स्वरात त्याला बोलत होता, “खेळपट्टीवरून दूर हो! हा माझा फॉलो-थ्रू आहे, तुझा नाही,” असं सांगत मिराजकडे बोट दाखवलं. हा संवाद स्टम्प माइकवर स्पष्ट ऐकू आला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता दिसताच पंच कुमार धर्मसेना यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही खेळाडूंना शांत केलं.

मिराजने मात्र वाद वाढवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याने पंच धर्मसेना यांना सांगितलं, “मला दिसलं नाही, मी पाहिलंच नाही.” या घटनेनंतर काही क्षण मैदानावर तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र पंचांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. पंच कुमार धर्मसेना मेहदी हसन मिराजशी बोलत असतानाही मिचेल स्टार्कचा राग पूर्णपणे शांत झालेला दिसत नव्हता.

तो मिराजकडे पाहत म्हणाला, “तू आता बांगलादेशमध्ये नाहीयस, समजलास?” स्टम्प माइकवर ऐकू आलेल्या या टिप्पणीमुळे मैदानावरील वातावरण आणखी तापलं. स्टार्कची ही प्रतिक्रिया स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणारी होती, तर मिराजने पुन्हा कोणताही वाद वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. पंच धर्मसेना यांनी दोन्ही खेळाडूंना समजावत परिस्थिती नियंत्रणात ठेवली, पण स्टार्कच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र, या वादात मेहदी हसन मिराजला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचा पाठिंबा मिळाला. चॅनल सेव्हनच्या समालोचनादरम्यान पाँटिंगने आपलं मत व्यक्त करत म्हटलं, “मला वाटत नाही की त्याने (मिराजने) हे मुद्दाम केलं गेलं होतं.” दरम्यान, त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हसन महमूदने चेंडू परत गोलंदाजाकडे बचावात्मक खेळला. स्टार्कने चेंडू उचलला आणि पुन्हा मिराजला काहीतरी बोलताना दिसला.