Mitchell Starc Breaks Kapil Dev Record in Darwin Test: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कसोटीत मागे टाकलं आहे. दरम्यान मिचेल स्टार्कने या सामन्यात पहिली विकेट घेत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आता दुसरी विकेट घेताच त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत त्याने भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांना मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लिटन दासची विकेट घेत त्याने हा टप्पा गाठला.
स्टार्कने लिटन दासला खातंही उघडू न देता बाद केलं आणि या सामन्यातील आपली दुसरी विकेट घेतली. या कामगिरीसह त्याने कपिल देव यांना मागे टाकलं. आता सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या पहिल्या १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी त्याला केवळ डेल स्टेनला मागे टाकायचं आहे. सध्या ४३५ विकेट्ससह स्टार्क ११ व्या स्थानावर आहे.
लिटन दासची विकेट घेतल्यानंतर, स्टार्कच्या कसोटी विकेट्सची एकूण संख्या ४३५ वर पोहोचली आहे. कपिल देव यांनी ४३४ विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता स्टार्कची नजर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्यावर आहे. या यादीत ४३९ विकेट्ससह डेल स्टेन १० व्या स्थानावर आहे; त्याला मागे टाकण्यासाठी स्टार्कला आणखी ५ विकेट्स घेण्याची गरज आहे.
सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या बाबतीत, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ८०० विकेट्ससह ऐतिहासिक विक्रम नोंदवून अव्वल स्थानावर आहे. शेन वॉर्न ७०८ कसोटी विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जेम्स अँडरसन ७०४ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीतील इतर गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), स्टुअर्ट ब्रॉड (६०४), नॅथन लायन (५६८), ग्लेन मॅकग्रा (५६३), रविचंद्रन अश्विन (५३७), कोर्टनी वॉल्श (५१९) आणि डेल स्टेन (४३९) यांचा समावेश आहे.
डार्विन कसोटीच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशविरूद्ध संघर्ष करत आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बांगलादेशने सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाला केवळ १९८ धावा करता आल्या, तर बांगलादेशने ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे आता १०० हून अधिक धावांची आघाडी आहे. बांगलादेशी संघ या डावात आणखी किती धावा करतो, यावर सर्वांच्या नजरा असतील.
