नवी दिल्ली : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाची संधी आहे. मात्र, त्यासाठी भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दमदार कामगिरी करणेचे गरजेचे आहे, असे मत माजी कर्णधार मिताली राजने व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारपासून (१० फेब्रुवारी) महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून भारताची सलामीची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी रंगणार आहे. या स्पर्धेतील भारताचे यश आघाडीच्या फलंदाजांसह गोलंदाजांवरही अवलंबून असेल, असे मितालीला वाटते. भारताच्या गोलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मिताली म्हणाली.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची मदार आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर असेल. स्मृती मानधना लयीत असून सामना एकहाती जिंकवण्याची तिच्यात क्षमता आहे. हरमनप्रीत कौरनेही अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, या स्पर्धेत मोठे यश मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांसारख्या संघांना नमवावे लागेल. त्याकरिता अन्य फलंदाजांचे योगदानही महत्त्वाचे ठरेल,’’ असे मितालीने ‘आयसीसी’च्या संकेतस्थळावरील आपल्या स्तंभलेखात लिहिले.
यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या मालिकेसह ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात शिखा पांडेचा अपवाद वगळता अनुभवी गोलंदाजांची कमतरता आहे. ‘‘विश्वचषकात भारतीय गोलंदाजांची कसोटी लागेल आणि त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे,’’ असे मिताली म्हणाली.
दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या पहिल्या युवा महिला (१९ वर्षांखालील) विश्वचषकात भारतीय संघ विजेता ठरला होता. सलामीवीर शफाली वर्माने या संघाचे नेतृत्व केले होते, तर यष्टिरक्षक रिचा घोषचाही संघात समावेश होता. या स्पर्धेतील अनुभवाचा शफाली आणि रिचाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात फायदा होईल अशी मितालीला आशा आहे.
‘डब्ल्यूपीएल’मुळे महिला क्रिकेटला चालना
महिलांच्या प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे पहिले पर्व या वर्षी खेळवले जाणार असून या स्पर्धेमुळे महिला क्रिकेटला अधिक चालना मिळेल याची मितालीला खात्री आहे. ‘‘महिला क्रिकेटमध्ये आता सतत बदल होत आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पूर्वी १४० धावाही पुरेशा होत्या. मात्र, आता १६०-१८० धावांचे आव्हानही पार केले जाते. त्यामुळे सामने अधिक चुरशीचे होत आहेत. जगभरात विविध ट्वेन्टी-२० लीग सुरू झाल्याने हा बदल घडून आला आहे. आता भारतात लवकरच महिलांच्या प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमुळे भारतातील स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळेल. यासह त्यांना आर्थिक स्थैर्यही मिळेल,’’ असे मिताली म्हणाली.
ऑस्ट्रेलिया प्रमुख दावेदार
फलंदाजांच्या मजबूत फळीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे मत मितालीने व्यक्त केले. ‘‘ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे, यावर सर्वाचेच एकमत होईल. मला चुरशीचे सामने होतील अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी मजबूत आहे. त्यांच्या तळाच्या फलंदाजही महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यांना पराभूत करणे नेहमीच अवघड असते. एकच भूमिका निभावण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे अनेक फलंदाज आहेत. त्यामुळे एकीला अपयश आल्यास दुसरी फलंदाज संघाला सावरून घेते. मात्र, बाद फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ ऑस्ट्रेलियाला टक्कर देतील अशी मला आशा आहे,’’ असे मितालीने नमूद केले.