महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिलांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या महिलांनी भारतीय महिलांवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघाच्या या पराभवापेक्षा उपांत्य सामन्यात मिताली राजला संघातून वगळण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. या निर्णयानंतर मिताली राज हिने BCCI च्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली खंत व्यक्त केली होती. प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मला अपमानास्पद वागणूक दिल्याचे तिने म्हटले होते. पण मितालीनेच सलामीला फलंदाजीचा हट्ट धरत तसे न झाल्यास निवृत्ती स्वीकारेन अशी धमकी दिल्याचे रमेश पोवार यांनी सांगितले.

रमेश पोवार यांच्या या वक्तव्यानंतर आता मिताली राज हिने यावर ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. मी माझ्या २० वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी खेळले. घाम गाळला. पण माझ्यावर असे आरोप केल्यांनतर मात्र माझी ही कारकीर्द वाया गेल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

मितालीने केलेल्या आरोपानंतर BCCI चे CEO राहुल जोहरी आणि मुख्य व्यवस्थापक साबा करीम यांची मुंबईतल्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी बोलत असताना रमेश पोवार यांनी मितालीशी आपलं पटत नसल्याचं मान्य केले. तसेच मितालीला सांभाळणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत तिला संघातून वगळण्याचा निर्णय हा सांघिक होता, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मितालीने रमेश पोवार यांच्यावर आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडलजी यांच्यावर संघातून वगळण्याच्या निर्णयाचा कट रचल्याचा आरोप केला होता. तसेच तो निर्णय म्हणजे माझे करिअर संपवण्याचा कट असल्याचेही तिने म्हटले होते.