scorecardresearch

मितालीने चिखलफेक करण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करावं !

माजी खेळाडू मदनलाल यांचा मिताली राजला सल्ला

मिताली राज (संग्रहीत छायाचित्र)
मिताली राज (संग्रहीत छायाचित्र)

भारतीय महिला क्रिकेट संघातील मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वादावर भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. काही वेळा खेळामध्ये कटू निर्णय घ्यावे लागतात, मात्र खेळाडूंनी याचं वाईट वाटून घ्यायचं नसतं. रमेश पोवार हा मितालीचा शत्रु नाहीये, त्यामुळे मितालीने चिखलफेक करण्याऐवजी आपल्या खेळावर लक्ष केंद्रत करावं. मदनलाल एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

अवश्य वाचा – मानापमान नाटय़!

महिला विश्वचषकात, उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात मिताली राजला संघात जागा देण्यात आली नव्हती. सामना संपल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने Winning Combination बिघडवायचं नसल्यामुळे मितालीला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर काही दिवसांनी मिताली राजने बीसीसीआयला पत्र लिहीत, प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुलजी यांच्यावर आरोप केले होते. याचसोबत रमेश पोवार यांनी आपला छळ केल्याचंही मितालीने आपल्या पत्रात म्हटलं होतं.

अवश्य वाचा – महिला संघाचा प्रशिक्षक तुम्हीच निवडा, प्रशासकीय समितीची सचिन-सौरव-गांगुलीला विनंती

यावेळी बोलत असताना मदनलाल यांनी रमेश पोवारची पाठराखण केली आहे. “प्रशिक्षकांना सारखं बदलत राहणं संघासाठी चांगली गोष्ट नाही. असं करायचच असेल तर त्या जागेवर एक ठोकळा आणून ठेवा जो खेळाडूंनी सांगितलेली गोष्ट ऐकेल. प्रशिक्षक हा संघाचा महत्वाचा हिस्सा असतो व त्याने घेतलेले निर्णय सर्व सहकाऱ्यांना बंधनकारक असतात. रमेश पोवार यांनाही आपला संघ जिंकावा असंच वाटत असणार. मग या प्रकरणानंतर पोवार यांनाच लक्ष्य का केलं जात आहे? निवड समितीचे सदस्यही या निर्णयाचा हिस्सा असणार. मग त्यांना कोणी जाब विचारायचा?”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2018 at 15:44 IST

संबंधित बातम्या