‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा : भारतीय खेळाडूंचे संमिश्र यश

पुरुष गटात अनुभवी ग्रँडमास्टर के. शशिकिरणने उझबेकिस्तानच्या शमसुद्दीन वाखिदोव्हचा पराभव केला.

रीगा (लॅटविया) : भारतीय खेळाडूंना ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत संमिश्र यश मिळाले. पुरुष गटात दोघांनी आणि महिलांमध्ये पद्मिनी राऊतने विजयाची नोंद केली. पहिल्या फेरीत विजय मिळवणाऱ्या द्रोणावल्ली हरिकाला दुसऱ्या फेरीत भारताच्याच दिव्या देशमुखने बरोबरीत रोखले.

पुरुष गटात अनुभवी ग्रँडमास्टर के. शशिकिरणने उझबेकिस्तानच्या शमसुद्दीन वाखिदोव्हचा पराभव केला. तर युवा आर. प्रज्ञानंदने बी. अधिबनला ५५ चालींमध्ये पराभूत केले. त्यामुळे दोन फेरींनंतर शशिकिरण आणि प्रज्ञानंद या दोघांच्याही खात्यात १.५ गुण आहेत. फ्रान्सच्या अलीरेझा फिरौझासह तीन खेळाडू प्रत्येकी दोन गुणांसह अव्वल स्थानी आहेत.

या स्पर्धेत १० भारतीय खेळाडू सहभागी झाले असून ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णा हा त्यांच्यातील सर्वात अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. मात्र, त्याला दुसऱ्या फेरीत रशियाच्या अलेक्सी ड्रीव्हकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीतही त्याला व्लाडिस्लाव्ह कोव्हालेव्हने पराभूत केले होते. १७ वर्षीय निहाल सरिनने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या फॅबिआनो कॅरुआनाला बरोबरीत रोखले. डी. गुकेशचा सामनाही बरोबरीत सुटला. महिलांमध्ये, हरिका आणि दिव्या यांच्यातील दुसऱ्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला. पद्मिनीने स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगवर मात केली. आर. वैशालीचा जॉर्जियाच्या निनो निनो बात्सिएव्हिलीने पराभव केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mixed success for indian players in fide grand swiss chess tourney zws

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला