Modi Meets Navdeep Singh Paralympics Gold Medallist : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकं जिंकून भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) खेळाडूंची भेट घेतली, त्यांच्याशी गप्पा मारल्या व पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मोदी यावेळी भारताचा भालाफेकपटू नवदीप सिंह याच्याबरोबर हास्यविनोद करताना दिसले. नवदीपने यावेळी मोदी यांना त्याची टोपी भेट म्हणून दिली. नवदीपने मोदींना स्वतः टोपी घातली. नवदीपला मोदींच्या डोक्यावर टोपी घालता यावी यासाठी मोदी जमिनीवर बसले होते. मोदी यांनी नवदीपच्या डाव्या हातावर स्वाक्षरी देखील केली. ते नवदीपला म्हणाले, “सर्वजण तुला घाबरतत हे तुला माहितीय का?” यावर नवदीपनेही हसून प्रतिसाद दिला.

मोदी नवदीपला म्हणाले, “तू तुझा भाला फेकतानाचा व्हिडीओ पाहिला आहेस का? तू इतक्या आक्रमकपणे भाला फेकलास. तो क्षण पाहून सर्वांना नवल वाटलं. तुला बघून सगळेजण घाबरतात हे तुला माहितीय का?” त्यावर नवदीप म्हणाला, “गेल्या वेळी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत मी चौथ्या स्थानावर राहिलो होतो. परंतु, पॅरिसला जाताना पदक जिंकायचं हे ठरवूनच गेलो होतो. मी तुम्हाला देखील तसं वचन दिलं होतं जे मी पूर्ण केलं आहे”.

हे ही वाचा >> WTC Final 2025 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

‘बुटका’ म्हणून हिणवल्या गेलेल्या नवदीपची ‘सुवर्णझेप’

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये रविवारी (८ सप्टेंबर) भारताचा भालाफेकपटू नवदीप सिंह याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि देशाच्या पारड्यात आणखी एक पदक आलं. नवदीपच्या या कामगिरीमुळे भारताचं पदकतालिकेतील स्थान आणखी भक्कम झालं. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच नवदीपच्या वडिलांचं निधन झालं आहे. परंतु, तो धक्का पचवून मैदानात उतरलेल्या नवदीपने देशाला नवी सुवर्णझळाळी मिळवून दिली.

हे ही वाचा >> Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

४ फूट चार इंच उंची असणाऱ्या नवदीपने तब्बल ४७.३२ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. सुरुवातीला नवदीप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्याचं रौप्यपदक निश्चित झालंच होतं. पण पहिल्या क्रमांकावरच्या इराणच्या सादेह बैत सयाहला गैरवर्तनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर नवदीपचं सुवर्णपदक निश्चित झालं. नवदीपने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, त्यावेळी त्याला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. तो त्या स्पर्धेत चौथा आला होता.