धार्मिक कार्य करणारा वेदसंपन्न पुरोहित गायत्री मंत्र विसरला, अतिशय सुगरण काकूंचा साधा आमटी-भात बिघडला, गणिताचा प्राध्यापक बेरजा चुकायला लागला. हे सर्व जसं अकल्पित वाटतं तसेच भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजासमोर शरण जातात हे अकल्पित वाटतं. साऊथ हॅम्पटनला मोईन अलीनं सामन्यात आठ बळी घेतले आणि भारतीय थिंक टँकचे धाबे दणाणले. इंग्लंडला जाताना स्विंगचा मुकाबला कसा करायचा याचे फलंदाजांकडून धडे घोटवून घेतले होते. पण फिरकीच्या रूपात एक नवीनच डोकेदुखी समोर आली. हे म्हणजे आकृत्या कच्च्या आहेत म्हणून मुलाकडून आकृत्या गिरवून गिरवून घ्यायच्या आणि मुलानं परीक्षेत गाळलेल्या जागा भरामध्ये मार्क घालवावे असा प्रकार झाला.
मोईन अलीला विकेट्स कशा मिळाल्या याची मीमांसा केली तर पहिल्या डावातील रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी त्याला विकेट बहाल केल्या. रोहित शर्माला पेशन्स नाही पासून त्याला परिस्थितीचं गांभीर्य नाही इथपर्यंत आता आपल्याला येऊन पोहोचायला हरकत नाही. गुणवत्ता वजा निष्ठा बरोबर शून्य. उद्या रोहितनं शंभर केला तरी तो आऊट होताना बेजबाबदारपणेच होणार. कसोटी क्रिकेटमधली संधी ‘करो या मरो’ची असते. फन फेअरमधल्या बंदुकीनं फुगे उडवायचा खेळ नाही तो. पाच गोळय़ा वाया गेल्या तर घ्या अजून पाच. तरीही नाही उडाले तर घ्या अजून दहा. धोनीनं रोहितला प्रसादवाटपासारखे चान्सेस बहाल केले आहेत. बास आता. ज्यांच्या तब्येतीला कसोटी मानवत नाही त्यांना आहे ना आयपीएल. रोहितच्या क्लासनं भारावलेला मी एक वेडा होतो, पण या माणसानं उद्विग्न केलं. ही मे गो इन हिस्ट्री अ‍ॅज द बेस्ट वेस्टेड टॅलंट.
दुसऱ्या डावात मोईन अलीनं घेतलेले पुजारा, कोहली यांचे बळी आणि रूटनं घेतलेला धवनचा बळी जास्त काळजीत टाकणारे आहेत. कारण ते बचाव करताना आऊट झाले. बेजबाबदार फटके मारून नाही. इथं दोन गोष्टींचा विचार करायला हवा. एक म्हणजे मोईन अली खरंच पार्टटाइम स्पीनर आहे का? का इंग्लंडनं भारताला गाफील ठेवण्यासाठी मोईनबद्दल पार्ट टाइमची हाकाटी पेटवून दिलीय? मोईन इंग्लंडचा एकेकाळचा ऑफ स्पीनर. पीटर सचकडून गोलंदाजीचे धडे घेतोय. कूकदेखील त्याला फर्स्ट चेंज म्हणून आणतोय आणि त्याचे चेंडू अचूक टप्प्यावर पडतायत, उसळी घेतायत, वळतायत. भारतीयांनो, तुम्ही फसलात. मोईन दोन-चार ओव्हर्स टाकणारा ऑफ स्पीनर नाही. दुसरी गोष्ट, भारतीय स्पर्धामध्ये फलंदाजांना चांगली स्पीन गोलंदाजी खेळायला मिळत नाही. आजकाल घरेलू क्रिकेटमध्ये पण ग्रीन टॉप असतात. ऑफ स्पीनर भारतीय फलंदाजांची डोकेदुखी आहे हे कूकने ओळखले आहे. भारतात स्वाननं कमाल केली होती हे कूक विसरला नाही. त्यामुळे स्पीनर्सला खेळणं भारतीयांनासुद्धा आव्हानात्मक झालं आहे. हे विसरून चालणार नाही. उगाच स्पीनरचा टप्पा पडतोच कसा, त्याची जागा प्रेक्षकांत वगैरे बोलणं फुशारकी मारणं आहे. टी२० मध्ये स्पीनर्सनी मारणं वेगळं. कसोटीत ते अशक्य नाही, पण सोपं नाही.
पराभवानंतर नेहमीप्रमाणे आरडाओरडा सुरू झाला. पण मुळात इंग्लंडची गोलंदाजी उजवी, घरच्या खेळपट्टय़ांवर फलंदाजांचा अनुभव दांडगा. आपली गोलंदाजी मर्यादित. प्रत्येक मॅचला वीस बळी घेण्याची क्षमता वाटत नाही. लॉर्ड्सला अनेक गोष्टी जुळून आल्या. खूप आश्वासक विजय नव्हता तो. बऱ्याच लोकांनी त्याचा पर्वत उभा केला. उरलेल्या दोन सामन्यांत सांघिक प्रयत्नातून काही चमत्कार घडतो का पाहायचं. चमत्कार शब्द महत्त्वाचा. वाहवत न जाता खेळाचा लेखाजोखा मांडला तर त्रास होणार नाही. पण कसोटी क्रिकेटची मजा न्यारीच गडय़ांनो!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com