भारत सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा हे कलम रद्द करण्याच्या चर्चा करण्यात आल्या होत्या, पण अखेर २०१९ मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय जाहीर केला. भारताचा हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला. पाकिस्तानचे धाबे दणाणल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरूद्ध टोकाची मतं मांडली. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या एका परिषदेत आपली मते व्यक्त केली. त्यावेळी दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे इम्रान खान म्हणाले होते. त्यावरून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने त्यांच्यावर जहरी टीका केली.

“दहशतवादाला धर्म नसतो. पण पाकिस्तानला मात्र दहशतवादाविरोधात खूप काही करणं गरजेचं आहे. पाकिस्तानच्या कुशीतूनच दहशतवादी तयार होत आहेत. दहशतवादाला मूळ खतपाणी पाकिस्तानच्या धरतीवर मिळते आहे. युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्र संघ) मधील तुमचे भाषण आणि एक महान क्रिकेटपटू ते पाक लष्कर, दहशतवाद्यांच्या हातातालं बाहुलं ही तुमची घसरण खूपच दुर्दैवी आहे”, अशी घणाघाती टीका मोहम्मद कैफ याने केली.

दरम्यान, मोहम्मद कैफ याने स्पर्धात्मक क्रिकेटमधून १३ जुलै २०१८ मध्ये निवृत्ती जाहीर केली आहे. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी कैफने निवृत्तीची घोषणा केली. योगायोग म्हणजे २००२ साली ज्या दिवशी इंग्लंडविरुद्ध झालेल्या नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी झुंजार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता, त्याच तारखेला त्याने निवृत्ती स्वीकारली. या मालिका विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून विजयोत्सव साजरा केला होता. या विजयाला १६ वर्षे पूर्ण होतानाच कैफने निर्णय जाहीर केला.