Mohammamod Kaif On Team India: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून कर्णधार शे होपची बॅट पुन्हा एकदा तळपली. होपच्या शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २४७ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी या आव्हानाचा यशस्वी बचाव करत सामना जिंकला अंक आणि मालिका बरोबरीत आणली.
या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने भारतीय संघाच्या संरचनेवर जोरदार टीका केली आहे. चौथा सामना जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने मालिकेत २-२ ने बरोबरी केली आहे. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्याआधी मोहम्मद कैफने भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणावर टीका करत म्हटले की, २ वर्षानंतर जेव्हा भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी हा संघ जेतेपद राखू शकणार नाही.
सामना झाल्यानंतर क्रिकबझवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला की, “भारतीय संघाचा का हरला? यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची गोलंदाजी. पराभवाला कारणीभूत तेच आहेत. २४७ धावा खूप होतात, आपण खराब गोलंदाजीमुळेच हरलो. धावफलकावर खूप धावा होत्या. पण हे पहिल्यांदाच घडलंय असं नाही. पाच सामन्यांची मालिका असेल तर त्यापैकी ३ सामने फलंदाज तुम्हाला जिंकवून देऊ शकतात. तर उरलेले २ सामने गोलंदाज जिंकवून देऊ शकतात. पण इथे मात्र, गोलंदाज तुम्हाला एकही सामना जिंकवून देत नाहीत. या टीम कॉम्बिनेशनसह तुम्ही कधीच वर्ल्डकप जिंकू शकणार नाही.”
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा ही अर्शदीप सिंग आणि मयंक यादव यांच्यावर होती. पण दोघांनी खोऱ्याने धावा खर्च केल्या. दोघांनी मिळून ८ षटकात १०४ धावा खर्च केल्या. तर अक्षर पटेलने ४ षटकात ४५ धावा खर्च केल्या. तर प्रिन्स यादवने ३६ धावा खर्च केल्या आणि १ गडी बाद केला. प्रिन्स यादव हा या सामन्यात भारताकडून कमी धावा खर्च करणारा वेगवान गोलंदाज ठरला. सामना झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनेही मान्य केलं की, गोलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. फलंदाजांनी पाठलाग करताना चांगली कामगिरी केली. पण ठरल्याप्रमाणे गोलंदाजी करता आली नाही, त्यामुळेच पराभव झाला.
