Mohammad Nabi Record In Icc T20 World Cup: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत अफगाणिस्तानचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. रशीद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानाला सुपर ८ मध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हातचा सामना गमावण्याचा अफगाणिस्तानला चांगलाच फटका बसला. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करू शकलेला नाही. पण जाता जाता अफगाणिस्तानने कॅनडावर दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यात गोलंदाजी करताना ४ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद नबीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

मोहम्मद नबीची विक्रमी कामगिरी

या सामन्यात धावांचा बचाव करताना मोहम्मद नबीने मोलाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात कॅनडाच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात तो ४ गडी बाद करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद नबीने हा पराक्रम वय ४१ वर्ष ४९ दिवस इतकं असताना केला आहे. यासह तो वनडे आणि टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ४ गडी बाद करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

अफगाणिस्तानच्या विजयात मोहम्मद नबीचा मोलाचा वाटा राहिला. नबीने आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या बाबतीत त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानला मागे टाकलं आहे. रशीद खानने २०२१ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध खेळताना ९ धावा खर्च करून ४ गडी बाद केले होते. अफगाणिस्तानकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम मुजीब उर रहमानच्या नावावर आहे. त्याने ५ गडी बाद केले होते.

अफगाणिस्तानचा विजय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांअखेर ४ गडी बाद २०० धावांचा डोंगर उभारला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. तर रहमानुल्लाह गुरबाजने ३० धावा केल्या. तर सेदीकुल्लाह अटलने ४४ धावा केल्या. अफगाणिस्तानने दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना कॅनडाकडून एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ठकेरने ३० आणि जफरने २८ धावा केल्या. पण कॅनडाला ८ गडी बाद ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह अफगाणिस्तानने हा सामना ८२ धावांनी आपल्या नावावर केला.