ICC Fined After South Africa vs Afghanistan: दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकप इतिहासातील सर्वात रोमांचक सामना खेळवला गेला. अखेरच्या षटकातील थरारानंतर सामना बरोबरीत सुटला. यानंतर पहिली सुपर ओव्हरदेखील बरोबरीत सुटली, त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळवली गेली आणि अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. अफगाणिस्तानच्या संघाने या सामन्यात अगदी तोडीस तोड कडवी झुंज दिली. त्यानंतरही पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता आयसीसीने अफगाण संघाला धक्का दिला आहे.
११ फेब्रुवारीला झालेल्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू मोहम्मद नबी याला दंड ठोठावण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेने रोमांचक सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला. पण त्या सामन्यादरम्यान झालेल्या एका चुकीमुळे मोहम्मद नबीला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल आयसीसीने मोहम्मद नबीला आचारसंहितेच्या कलम २.४ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. अफगाणिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १४ व्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर पंचांशी हुज्जत घातली होती.
ICCने मोहम्मद नबीवर का केली कारवाई?
१४व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी गोलंदाजीला आला, तेव्हा नबी स्ट्राईकवर होता. त्याने एनगिडीने हातात घातलेला पिवळ्या रंगाचा बँड काढावा असं पंचांना सांगतिलं, या विषयावर तो पंचांशी हुज्जत घालताना दिसला. एनगिडीच्या हातातील बँड हा फिकट पिवळ्या रंगाचा होता, उजव्या हाताने गोलंदाजी करताना चेंडू बँडमुळे दिसणार नाही, असं नबीला वाटलं. त्यामुळे नबीने त्याला बँड काढायला सांगावं अशी पंचांशी चर्चा करत होता.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला होता. एक नाही तर दोन सुपर ओव्हरनंतर सामन्याचा निकाल लागला होता. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. तर दक्षिण आफ्रिका हा दोन सुपर ओव्हर खेळत विजय मिळवणारा देखील इतिहासातील पहिलाच संघ ठरला.
सुरूवातीला सामना बरोबरीत सुटला, दोन्ही संघांनी प्रत्येकी १८७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत राहिली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये प्रत्येकी १७ धावा झाल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने २४ धावांचं योगदान अफगाणिस्तानला दिलं. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना रहमानुल्ला झेलबाद झाला आणि परिणामी दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला.
अफगाणिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा होता. पण आणखी एका पराभवामुळे सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा दोन सामन्यांतील हा सलग दुसरा विजय होता. दोन्ही संघ स्पर्धेच्या ड गटात आहेत, न्यूझीलंड सध्या गुणतालिकेत आघाडीवर आहे, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे
