Mohammad Nadeem Record: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात श्रीलंका आणि ओमान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेने ओमानवर १०५ धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकल्लेत पार पडला. या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने एकतर्फी विजयाची नोंद केली. ओमानने हा सामना गमावला, पण ओमानचा फलंदाज मोहम्मद नदीमने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेने ओमानसमोर डोंगरा इतकी धावसंख्या उभारली. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना ३ फलंदाजांनी दमदार अर्धशतकं झळकावली. पवन रथनायके, कर्णधार दासून शनाका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने २२५ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान दासून शनाकाने अवघ्या १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो टी -२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला.

श्रीलंकेने ओमानसमोर विजयासाठी मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसले. फलंदाजांनी अर्धशतकं झळकावल्यानंतर गोलंदाजांनी आपलं काम योग्यरित्या पूर्ण केलं. गोलंदाजांनी विकेट्स काढून दिल्या. धावांचा पाठलाग करताना ओमानला २० षटकांअखेर ९ गडी बाद १२० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना ओमानचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. पण एकमेव फलंदाजाने एकाकी झुंज दिली.

ओमानचा सर्वात अनुभवी खेळाडू मोहम्मद नदीमने दमदार अर्धशतकी खेळी केली. यासह तो आयसीसीच्या स्पर्धेत अर्धशतकी खेळी करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने वय ४३ वर्ष १६१ दिवस इतकं असताना अर्धशतकं झळकावलं. याआधी १९९१ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडच्या फ्लेवियन अपोसोने ५८ धावांची खेळी केली होती. त्याने वय ४३ वर्ष १२१ दिवस असताना ही विक्रमी कामगिरी केली होती.