Mohammad Rizwan Bizarre Wicket Video: मीरपूर कसोटीतील पाकिस्तान क्रिकेट संघाचा पराभव जितका लाजिरवाणा होता, तितकीच मोहम्मद रिझवानची विकेटही चर्चेत होती. यष्टीरक्षक-फलंदाज रिझवानला आधी मैदानावर जोरदार ट्रोल करण्यात आलं आणि नंतर तो अशा चेंडूवर बाद झाला, ज्याने तो स्वतःही चकित झाला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मोहम्मद रिझवानला स्वत:च्या देशात किंमत देत नसल्याचं म्हणत बांगलादेशच्या विकेटकिपरने ट्रोल केलं.
पाकिस्तान संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज, मोहम्मद रिझवान, प्रत्येक फॉरमॅटमध्ये अपयशी ठरत आहे. एकीकडे पाकिस्तानी चाहते रिझवानवर टीका करत त्याची खिल्ली उडवत आहेत, तर दुसरीकडे नुकत्याच बांगलादेशविरूद्ध कसोटी सामन्यादरम्यान संघातील एका खेळाडूने त्याचा अपमान केला.
२६८ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. जेव्हा रिझवान फलंदाजीला आला, तेव्हा संघाने १२१ धावांत पाच गडी गमावले होते. पहिल्या डावात ५९ धावा करणाऱ्या रिझवानकडून संघाला खूप अपेक्षा होत्या, पण दुसऱ्या डावात तो केवळ १५ धावाच करू शकला. याआधी मैदानावरील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
सौद शकीलसोबत भागीदारी करत, रिझवानने संघाला विजय मिळवून देण्याची किंवा पराभवापासून वाचवण्याची जबाबदारी उचलली होती. ही भागीदारी पाकिस्तानसाठी निर्णायक ठरू शकत होती आणि बांगलादेशला ती तोडणं आवश्यक होतं. क्रिकेट सामन्यादरम्यान फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी स्लेजिंग करणं ही काही नवीन गोष्ट नाही. बांगलादेशने नेमकं तेच केलं. रिझवान फलंदाजी करत असताना, बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दासने त्याचा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामशी बंगालीमध्ये साधलेला संवाद व्हायरल होत आहे.
लिटन दासने मोहम्मद रिझवानला विचित्र पद्धतीने केलं स्लेज
लिटन दास म्हणाला, “आता हे लोक सामना वाचण्यासाठी खेळतील, जिंकण्याचं यांच्यावर कोणतंही प्रेशर नाहीये आणि याला (रिझवानला) पाकिस्तानमध्ये बिलकुल इज्जत देत नाहीत. जर एखादा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला, तर त्याला आपल्या देशात कधीही परत जाता येणार नाही, त्याची प्रतिमा इतकी खराब आहे.”
रिझवानला ही भाषा समजली की नाही हे सांगणं वेगाने व्हायरल झाला. सोशल मीडिया युझर्सनी हा व्हिडिओ शेअर करून मोहम्मद रिझवानची खिल्ली उडवायला सुरुवात केली. लिटन दासच्या या वाक्यानंतर लगेचच रिझवान बाद झाला. वेगवान गोलंदाज नाहिद राणाचा आत येणारा चेंडू त्याने खेळण्याऐवजी बॅट वर करत सोडून दिला आणि चेंडू थेट त्रिफळा उडवून गेला. स्वत: मोहम्मद रिझवानदेखील ही विकेट पाहून चकित झाला.
रिझवान अवघ्या १५ धावांवर बाद झाला. यानंतर पाकिस्तानचा संघ लवकरच केवळ १६३ धावांवर सर्वबाद झाला आणि १०४ धावांनी पराभूत झाला. रिझवानने पहिल्या डावात ५९ धावा केल्या, पण त्याचे यष्टीरक्षणही खराब होतं, ज्यामुळे त्याला चाहत्यांकडून टीकेला सामोरे जावे लागले.
