Mohammad Shami 8-fer Wickets in Ranji Trophy Semi Final: मोहम्मद शमीने रणजी सेमीफायनलमध्ये बंगालकडून खेळताना एका डावात ८ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषक सुरू असतानाच रणजी ट्रॉफी २०२५-२६ चे सेमीफायनलचे सामने खेळवले जात आहेत. एक सेमीफायनल कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यात खेळवली जात आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना बंगाल व जम्मू-काश्मीर संघात होत आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत ८ विकेट्स आपल्या नावे केल्या.
मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो पूर्ण वेळ देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहे. ३५ वर्षीय मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. त्याची भेदक गोलंदाजी आणि विकेट्स घेण्याची क्षमता यात बिलकुल बदल झालेला दिसला नाही. सेमीफायनलमधील ८ विकेट्सच्या कामगिरीसह त्याने टीम इंडियाच्या सिलेक्टर्सचं लक्ष पुन्हा वेधून घेतलं आहे.
मोहम्मद शमीचे रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये एका डावात ८ विकेट्स
मोहम्मद शमीने जम्मू काश्मीरविरूद्ध सेमीफायनल सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील एक उत्कृष्ट कामगिरी केली. शमीने या सामन्यात २२.१ षटकं टाकली, ज्यामध्ये ३ मेडन षटकं होती. यादरम्यान त्याने ४.१०च्या इकॉनॉमीने ८ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये दोन गोलंदाजांना त्याने पायचीत करत, दोघांनी क्लीन बोल्ड केलं. शमीच्या या कामगिरीसह त्याने टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा ठोठावले आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जम्मू-काश्मीरच्या पहिल्या पाच फलंदाजांना बाद केल्यानंतर ३५ वर्षीय शमीने तिसऱ्या दिवशी आणखी तीन विकेट्स घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. जम्मू-काश्मीरचा पहिला डाव ३०२ धावांत आटोपला, तर बंगालने पहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या. या सामन्यापूर्वी रणजी ट्रॉफीमधील शमीची सर्वोत्तम कामगिरी ७/७९ अशी होती.
मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत ३६ विकेट्स घेतल्या आहेत. तर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने १६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर विजय हजारेमध्येही आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर त्याने १५ विकेट्स घेतल्या होत्या. यासह देशांतर्गत सीझनमध्ये त्याने आतापर्यंत ६७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय शमीने आंध्रप्रदेशविरूद्ध क्वार्टर फायनलमध्ये १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३३ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा करत अर्धशतक केलं होतं. वादळी कामगिरीनंतर आता पुन्हा त्याची भारताच्या कसोटी संघात निवड होणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

