Mohammad Shami Wife Instagram Post : विश्वचषकातील मोहम्मद शमीच्या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी भारावले होते. एकीकडे शमीच्या कौतुकाच्या पोस्ट चर्चेत असताना त्याची विभक्त पत्नी, हसीन जहाँच्या नावे अनेक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. अलीकडेच तिच्या नावे एक विधान व्हायरल झाले होते ज्यात हसीन जहाँने मोहम्मद शमी पैसे देऊन विकेट घेतो व फलंदाजांना आउट व्हायला सांगतो असे म्हटले होते. यापूर्वी हसीन जहाँने शमीवर अनेकदा कडवी टीका केली आहे त्यामुळे हे विधान तिचेच असेल असे समजून अनेकांनी या पोस्ट फॉरवर्ड केल्या होत्या. मात्र आता याविषयी स्वतः हसीन जहाँने स्पष्टीकरण दिले आहे. आधीच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना सुद्धा हसीन जहाँने शमीवर नवा आरोप लावला आहे. नेमकी तिची पोस्ट काय आहे हे पाहूया..
काय म्हणाली हसीन जहाँ?
“सामाजिक गुन्ह्यांची माहिती असणाऱ्यांना लगेच लक्षात येईल की माझी बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या कशा पसरवल्या जात आहेत. असामाजिक लोकांची टोळी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. २०१८ मध्ये शमीने उमेश नावाच्या एका मीडिया माफियाला कामावर ठेवले होते. त्याच्याच मदतीने शमी माझी खोटी बदनामी करत आहे. मी शमीवर कोणताही असा खोटा आरोप लावलेला नाही किंवा कोणती तक्रारही केलेली नाही.
शमी आणि त्याच्या कुटुंबाने माझ्यावर जसा अत्याचार केला होता त्याविषयीच मी फक्त तक्रार केली आणि तो प्रकार जगाच्या समोर आणला होता. कोर्टाने सुद्धा अजूनपर्यंत शमीला क्लीनचिट दिली नाही किंवा मला दोषी घोषित केलेलं नाही. पण विकलेल्या मीडियानेच न्यायाधीश बनून मला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हीच सांगा अशा गुन्हेगारांचं काय करायला हवं. समाजाला चुकीची माहिती देत आहेत, माझ्या आणि माझ्या लेकीच्या आयुष्याचा खेळ करत आहेत. आपल्या समाजात आता फक्त हेच सत्य शिल्लक आहे का की ज्याच्याकडे पैसे आहेत तो काहीही करू शकतो आणि समाज फक्त शांत तमाशा बघणार.
तुम्हीच ठरवा. शमी अहमद स्वतःचं पाप आणि गुन्हे लपवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. मी जर काही कारवाई केली नसती तर माझ्या आणि माझ्या मुलीच्या मृत्यूला पाच वर्षांहून अधिक काळ लोटला असता आणि तुमच्यापैकी कोणाला आमच्याबद्दल काहीच माहिती नसते. माध्यमांनी कधीही एक बाजू अन्यायकारकपणे मांडू नये; दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत.”
हे ही वाचा<< “हार्दिक पांड्या MI चा नवा कर्णधार होऊन, रोहितला..”, भारतीय माजी सलामीवीराचं बोल्ड विधान, म्हणाला, “धोनी सारखं..”
दरम्यान, यापूर्वी, हसीन जहाँ विश्वचषकादरम्यान चर्चेत आली होती, शमीच्या अप्रतिम गोलंदाजीच्या कामगिरीचे कौतुक केले जात असताना त्याच्या कामगिरीबद्दल तिला विचारले गेले होते, यावर ती म्हणाली की जर शमीने देशासाठी चांगली कामगिरी केली तर तो चांगली कमाई करेल आणि तिला आणि त्यांची मुलगी आयरा यांना पुरवण्यास सक्षम असेल. मी टीम इंडियाला माझ्या शुभेच्छा देईन पण त्याला नाही,” असे हसीन जहाँने न्यूज नेशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.