Mohammad Shami on Retirement: भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अखेर आपल्या भविष्याबद्दल आणि निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान न मिळाल्याने शमी चर्चेत होता, पण त्याने आता हे स्पष्ट केलं आहे की, नजीकच्या काळात निवृत्त होण्याचा त्याने विचार केलेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या अंतिम सामन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या शमीसमोर सध्या भारतीय संघात परतण्याचा मार्ग खडतर आहे. गेल्या काही वर्षांपासून दुखापतींनी त्याच्या कारकिर्दीला ग्रासल आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये ६७ बळी घेऊनही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, कामगिरी करणे हेच आपलं काम आहे, असे शमीने नेहमीच म्हटलं आहे. संघ निवडीचा निर्णय व्यवस्थापनाकडे असला तरी, निवड समितीने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी विचारणा केल्याचेही वृत्त होते, पण त्याने नकार दिला होता. आयपीएल २०२६ मध्ये शमी लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळेल, ज्यांनी त्याला १० कोटी रुपयांना संघात सामील केलं आहे.
यादरम्यान, शमीने निवृत्तीबद्दल आपले विचार मांडले. शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर त्याने स्पष्टपणे सांगितलं की, “मी थकलो की क्रिकेटला निरोप देईन. पण सध्या तरी निवृत्तीचा विचारही करत नाही, कारण असे विचार मनाला खचवतात. जर हा विचार मनात आला, तर समजा तुम्ही आधीच थकला आहात आणि थकलात म्हणजे कंटाळा आला आहे. मी आधीही सांगितलं आहे, ज्या दिवशी मला उठल्यावर कंटाळा आल्यासारखं वाटेल, त्या दिवशी मी क्रिकेट सोडेन. त्यामुळे हो, ज्या दिवशी आळस येईल किंवा कंटाळा येईल, त्या दिवशी मी थांबेन. पण सध्या ना मला कंटाळा आला आहे, ना आळस. मी खेळाचा आनंदघेतोय. निकालही चांगले आणि सकारात्मक आहेत.”
शमी पुढे म्हणाला, “गोलंदाज म्हणून मी माझं १०० टक्के देईन. माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडेन आणि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. बाकी नशीब बदलणं माझ्या हातात नाही. मी माझ्या वृत्तीने आणि जिद्दीनेच योगदान देऊ शकतो. लखनौने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे मी माझं सर्वस्व देईन. पण खेळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधान. मी केलेल्या तयारीनुसार मला योग्य निकाल मिळतील का, हा विचार महत्त्वाचा असतो. मी किती देशांतर्गत सामने खेळलो यापेक्षा माझा रिदम ठीक आहे का, यावर मी लक्ष केंद्रित केलं. जर ते व्यवस्थित असेल, तरच मी पुढचं विचार करतो.”
मोहम्मद शमीच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, तो अजूनही पूर्णपणे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे. तो पुन्हा भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मोहम्मद शमी आयपीएल २०२६ मध्ये आता १ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात खेळताना दिसेल.
