Mohammad Siraj on Late India World Cup Call Up: भारताने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरूवात विजयाने केली आहे. भारताने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव केला आणि या विजयात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मॅचविनिंग खेळी केली. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराजने ३ विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मोहम्मद सिराजला टी-२० विश्वचषकाच्या एक दिवस आधीच संघात सामील करण्यात आलं, पण याची माहिती त्याला कशी मिळाली, हे त्याने सांगितलं आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी सराव सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला वर्ल्डकपमधून बाहेर व्हावं लागलं. त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा बीसीसीआयने संघात समावेश केला. तर पहिल्याच सामन्यात वायरल ताप येत असल्याने जसप्रीत बुमराह सामन्यातून बाहेर झाला आणि मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळाली.

मोहम्मद सिराजने १५ फेब्रुवारीला माद्रिदमध्ये आपला आवडता क्लब रिअल माद्रिदचा ला लिगामधील सामना पाहण्याची योजना आखली होती. ज्यासाठी तो भारताबाहेर जायला निघणार होता. मात्र, सूर्यकुमार यादवचा एक फोन आला आणि सगळं चित्रच बदलून गेलं.

मोहम्मद सिराजला सूर्या फोनवर नेमकं काय म्हणाला?

“इथे येताना विमानात बसलो होतो, तेव्हा सगळं स्वप्नासारखं वाटत होतं,: सिराजने म्हणाला. त्याच्या आवाजात अजूनही आश्चर्याची छटा होती. “मला वाटलं नव्हतं की मी वर्ल्डकपचा भाग असेन. मी घरी कुटुंबासोबत वेळ घालवत होतो. अचानक सूर्याचा फोन आला आणि तो म्हणाला, ‘मियाँ, चल तयारी कर, बॅग पॅक कर.’ मी त्याला म्हटलं, ‘मस्करी करू नकोस.’ पण गॉड इज ग्रेट.”

IND vs USA: सूर्यादादाने इतिहास घडवला! टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू

मोहम्मद सिराजसाठी वर्ल्डकपमधील वानखेडेवरचा पहिलाच सामना भावनिक ठरला. ३ षटकांत २९ धावांत ३ विकेट्स अशी कामगिरी करताना त्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. “वर्ल्डकप खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे,” तो साध्या शब्दांत म्हणाला. “नव्या चेंडूसमोर फलंदाजी करणं सोपं नसतं, हे मला माहीत होतं… आणि तसंच झालं,” असं त्याने त्याच्या कामगिरीनंतर म्हटलं.

पहिल्या सामन्यादिवशी सकाळीच अनपेक्षित बातमी मिळाली आणि आजारी असलेल्या जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संघात उतरावं लागलं. “सुरुवातीला मला माहितच नव्हतं की मी खेळणार आहे. सकाळी मेसेज आला की तू सामना खेळणार आहेस, हे वाचून तेव्हा खूप आनंद झाला,” सिराज म्हणाला.

वर्ल्डकप संघाचा भाग नसताना काय प्लॅनिंग केलं होतंस, यावर तो हसत म्हणाला, “१५ तारखेला रिअल माद्रिदचा सामना पाहायचा प्लॅन होता. रमजानही सुरू होता. पण देवाची इच्छा, त्याची इच्छा असेल तर सगळं होतं. दुपारी ३ वाजता इथे पोहोचल्यानंतर मी व्हिडिओ प्लॅनिंग पाहिलं. योग्य तयारीशिवाय मोठा सामना खेळता येत नाही. हा वर्ल्डकप आहे.”

“मी नियमित खेळत असल्यामुळे मला काय करायचं आहे हे माहित होतं. काल रात्रीही तोच विचार होता, या-या लाईन-लेंग्थवर गोलंदाजी करायची. ईशान फलंदाजी केल्यानंतर म्हणाला की टू पेस विकेट आहे, आणि आम्हालाही वाटलं की १७० धावा चांगला स्कोअर ठरेल. तेच पुढे खरं ठरलं,” असं सिराजने सांगितलं.