scorecardresearch

IND vs AUS 1st ODI: ‘यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते…’, ऑस्ट्रेलियन संघाचा डाव गुंडाळल्यानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया

India vs Australia 1st ODI Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे मुंबईत खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs AUS 1st ODI Updates
टीम इंडिया (फोटो- ट्विटर)

India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात भारताला १८९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. चांगली सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियाचा डाव फसला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ ३५.४ षटकात १८८ धावांवर सर्वबाद झाला. सलामीला आलेल्या मिचेल मार्चने ६५ चेंडूत ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली.

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी ३-३ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली. यानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपली प्रतिक्रिया दिली.

पहिल्या डावानंतर मोहम्मद सिराज आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना म्हणाला, “यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला तुमच्या फिटनेसवर काम करावे लागते. नेटमध्ये खूप मेहनत करावी लागेल. जेव्हा तुमची लय असते आणि बाऊन्स आणि सीमची स्थिती चांगली असते, तेव्हा तुम्हाला परिणाम मिळतात. मुंबईच्या विकेट्सवर नेहमीच चांगली उसळी असते. मी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याचे फळ मिळाले.”

सिराज पुढे म्हणाला, “मी हार्दिकसोबत स्लिप लावण्याची योजना आखली होती. चेंडू थोडा मू्व्ह करत होता. त्यामुळे टाईट ऑफ स्टंप चॅनेलमध्ये गोलंदाजी करत राहण्याचा विचार होता. प्रत्येकाने थोडेफार योगदान दिले, तर खेळाडूंच्या आत्मविश्वासासाठी ते खरोखर चांगले होईल. ऑस्ट्रेलियाला १८८ धावांत गुंडाळण्यासाठी आम्ही चांगली कामगिरी केली आहे आणि आम्ही ते सहज साध्य करू.”

मोहम्मद सिराजने ५.४ षटके गोलंदाजी करताना तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. या दरम्यान त्याने २९ धावा दिल्या. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवताना संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला शेवटचा धक्का देखील त्यानेच दिला.

हेही वाचा – Tim Paine: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन क्रिकेटमधून झाला निवृत्त; अश्लील फोटो प्रकरणामुळं सापडला होता अडचणीत

भारताच्या डावाबद्दल बोलायचे तर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाने ५ षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद १६ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्कने एकाच षटकांत विराट (४) आणि सूर्याला (०) बाद करुन भारताला मोठा धक्का दिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 17:59 IST