Mohammad Yousaf On Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ स्पर्धेत एकच नाव तुफान चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. १५ वर्षांच्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय स्तर गाजवणाऱ्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून काढला. यासह वेगवान शतक झळकावण्याची संधी थोडक्यात हुकली. या खेळीनंतर भारतासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या यादीत आता पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफचं देखील नाव जोडलं गेलं आहे. ९७ धावांच्या खेळीनंतर मोहम्मद युसूफने वैभव सूर्यवंशीची तुलना पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीसोबत केली आहे.

मोहम्मद युसूफने आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिले की, “१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला पाहून मला युवा शाहिद आफ्रिदीची आठवण येते. तरुण, निडर आणि स्फोटक फलंदाज. हेच भविष्य आहे.” मोहम्मद युसूफने वैभव सूर्यवंशीची तुलना शाहिद आफ्रिदीसोबत केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं वादळ पाहायला मिळालं. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. त्याच्याकडे आयपीएल स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ३० चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर वैभव सूर्यवंशी २९ चेंडूत शतक पूर्ण करू शकला असता, पण २९ व्या चेंडूवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे त्याचा हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला.

हा रेकॉर्ड जरी हुकला असला तरीदेखील त्याने आणखी २ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. याआधी हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने ५९ षटकार खेचले होते. आता वैभवने ६५ षटकार खेचून हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यासह त्याने १६ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. प्लेऑफमध्ये सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने सुरेश रैनाच्या रेकॉर्डची बरोबरी केली.