Mohammad Yousuf blames 2021 win over India for Pakistan Cricket decline: पाकिस्तान क्रिकेट संघाची खराब कामगिरी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तान क्रिकेट सध्या आपल्या इतिहासातील सर्वात वाईट काळांतून जात आहे. इंग्लंड दौऱ्यावरील संघाच्या खराब कामगिरीनंतर सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्यात आलं, कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला पदावरून हटवण्यात आलं आणि आत निवड समितीचे सदस्य मिसबाह-उल-हक यांनी राजीनामा दिला आहे. यादरम्यान संघाच्या माजी खेळाडूने टीम इंडियाचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे.

क्रिकेट बोर्ड आणि ड्रेसिंग रूम यांच्यातील या अंतर्गत संघर्षावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी भाष्य केलं आहे, परंतु दिग्गज माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी भारतीय संघाचा उल्लेख एक धक्कादायक विधान केलं आहे. ज्यामुळे त्यांचं वक्तव्यही सध्या चर्चेत आहे. युसूफ यांनी पाकिस्तान क्रिकेटमधील खराब कामगिरीचं कारण २०२१ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध मिळवलेला ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानच्या क्रिकेटची कामगिरी सातत्याने घसरत आहे. याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धची मालिका २-० ने गमवावी लागली. २०२४मध्ये मायदेशात झालेल्या मालिकेनंतर बांगलादेशविरुद्धचा हा पाकिस्तानचा दुसरा ०-२ असा पराभव ठरला. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या सध्याच्या या अडचणींची सुरुवात भारताविरुद्धच्या २०२१च्या विजयापासूनच झाली, असं माजी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद युसूफने म्हटलं आहे.

सामाला टीव्हीशी संवाद साधताना युसूफ म्हणाला, “२०२१मध्ये भारताविरुद्ध जो सामना आपण जिंकलो, त्या विजयामुळे आपलं खूप नुकसान झालं. त्या विजयानंतर खेळाडूंना वाटू लागलं की त्यांनी काहीतरी खूप मोठं साध्य केलं आहे. त्यानंतर पुढे काय करायचं, हे त्यांना समजलं नाही. तुम्ही चांगली कामगिरी करत असाल, तर नम्र राहणं गरजेचं आहे. मात्र, जर तुम्ही अहंकाराने वागलात आणि इतरांचा अनादर केला, तर समस्या निर्माण होतात. पाकिस्तान क्रिकेटमध्ये आता अशाच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.”

युसूफ पुढे म्हणाले, “संघातील प्रत्येक खेळाडूला पाकिस्तानचा कर्णधार बनायचं होतं. त्याचे दुष्परिणाम आजही पाकिस्तान क्रिकेटला भोगावे लागत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत पाकिस्तानने जितकं क्रिकेट खेळलं, मग ते वनडे विश्वचषक असो, टी-२० विश्वचषक, आशिया कप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी त्यात अतिशय खराब खेळ पाहायला मिळाला. PCBने या काळात सातत्याने संघाला पाठिंबा दिला. अनेक प्रशिक्षक आले आणि गेले, संघाला मदत करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले. मात्र, कोणत्याही खेळाडूने पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली नाही. अखेर PCBला कठोर पाऊल उचलावं लागलं. PCBने घेतलेल्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”

PCBने दौऱ्याच्या मध्यात कारवाई करणं योग्य होतं, हे स्पष्ट करताना युसूफ म्हणाला, “हो, PCBने ही कारवाई कधी केली, यावर आक्षेप घेण्याचं कोणतंही कारण नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे आणि विशेष म्हणजे, या क्रमवारीत एकूण नऊच संघ आहेत. पाकिस्तानची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारण्यासाठी बोर्डाने काही कठोर पावलं उचलणं गरजेचं होतं.”