Mohammed Kaif On Virat Kohli And Rohit Sharma: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका सुरु असताना रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०२३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रोहितने २०२७ चा वर्ल्डकप जिंकण्याचा इच्छा व्यक्त केली होती. पण त्याआधीच रोहित निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तर विराट कोहली देखील निवृत्त होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं उदाहरण देत, रोहित आणि विराटचं समर्थन केलं आहे.
येत्या २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेत आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाला हा वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर विराट आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू संघात असणं गरजेचं आहे. पण भारतीय टीम मॅनेजमेंटचा वेगळाच प्लॅन समोर असल्याची माहिती समोर येत आहे. रोहित शर्माला बाहेर करुन, त्याच्याजागी यशस्वी जैस्वालला संधी देण्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. फक्त रोहित नव्हे, तर विराटलाही संघाबाहेर करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना सुरु असताना, एकच चर्चा रंगली होती. ती म्हणजे लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. पण बीसीसीआयने ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, “लॉर्ड्सच्या मैदानावरील सामना हा रोहितचा शेवटचा सामना नसेल. तो संघातील प्रमुख सदस्य आहे.” त्यामुळे रोहित इतक्यात तर निवृत्ती जाहीर करणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणाला, “२०२७ चा वर्ल्डकप हा गेल्या वर्ल्डकपहून अधिक आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे संघात अनुभवी खेळाडू असणं खूप गरजेचं असणार आहे. परिस्थिती वेगळी असेल, खेळपट्टीवर बाऊन्स असेल. तिथे या दोन्ही खेळाडूंची गरज भासेल. त्यांना आतापासूनच जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळावी, अशी आमची इच्छा असेल.”
तसेच अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सीचं उदाहरण देत तो म्हणाला, “लिओनेल मेस्सी ३९ वर्षांचा आहे, त्याचा अर्जेंटिनाचा संघ वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याने सेमीफायनलमध्ये एकही गोल केला नव्हता, पण त्याने एक असिस्ट केला होता. यालाच अनुभव म्हणतात. जर तुमच्याकडे युवा खेळाडू असतील, तर अनुभवी खेळाडू त्यांना दिशा दाखवण्याचं काम करत असतात. जसं अर्जेंटिनाला वर्ल्डकपमध्ये मेस्सीची गरज आहे. तसं भारतीय संघालाही वर्ल्डकपमध्ये विराट आणि रोहितची गरज आहे.”
