Indian Captains Who Won Under 19 World Cup: भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं आहे. या खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं काम हे अंडर -१९ वर्ल्डकप स्पर्धेने केलं आहे. ही स्पर्धा म्हणजे युवा खेळाडूंना आपलं टॅलेंट दाखवण्याचं व्यासपीठ आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. यावेळी हा वर्ल्डकप झिम्बाब्बे आणि नामिबियात होणार आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा या स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी पटकावली आहे. दरम्यान कोण आहेत भारताला ही स्पर्धा जिंकून देणारे कर्णधार? जाणून घ्या.

मोहम्मद कैफ (२०००)

भारतीय संघाने २००० साली पहिल्यांदाच अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. ज्यावेळी भारताने ही स्पर्धा जिंकली त्यावेळी युवराज सिंगसारखे खेळाडू या संघाचा भाग होते. या विजयाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना विश्वास दिला होता की, युवा खेळाडू देखील जागतिक स्तरावर आपल्या ठसा उमटवू शकतात.

विराट कोहली (२००८)

भारताला पुढील वर्ल्डकप जिंकण्यासाठी ८ वर्षे वाट पाहावी लागली. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला होता. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. इथूनच ‘किंग कोहली’च्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि भारतीय क्रिकेटला एक नवा सुपरस्टार मिळाला.

उन्मुक्त चंद (२०१२)

उन्मुक्त चंदने २०१२ मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. धावांचा पाऊस पाडण्यासह त्याने भारताला ट्रॉफी देखील जिंकून दिली होती. हे भारताचे या स्पर्धेतील तिसरे जेतेपद ठरले होते. जरी उन्मुक्तचे वरिष्ठ संघातील करिअर फार काळ टिकले नाही, तरी त्याचे हे यश इतिहासात अजरामर झाले.

पृथ्वी शॉ (२०१८)

युवा फलंदाज पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने चौथ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी राहुल द्रविड हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. तर शुबमन गिल हा सलामीवीर फलंदाज होता. सध्या तो भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे.

यश धूल (२०२२)

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाचव्यांदा जेतेपदाचा मान पटकावला होता. कोरोना काळात कर्णधार यश धूल काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र तरीदेखील भारताने जेतेपदाचा मान पटकावला होता.

टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकणार का?

यावेळी भारतीय अंडर १९ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आयुष म्हात्रेकडे असणार आहे. आयुष म्हात्रेने द्विपक्षीय मालिकांमध्ये फलंदाज आणि कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. आता या स्पर्धेतही त्याच्याकडून जेतेपद मिळवून देण्याची अपेक्षा असणार आहे. वैभव सू्र्यवंशी देखील पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता भारतीय संघ सहाव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.