Mohammed Shami Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. डबल हेडरचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हैदराबादच्या होम ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
सुरुवातीच्या १० षटकात संघातील चारही मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला आणि ट्रॅव्हिस हेड – अभिषेक शर्माच्या जोडीला स्वस्तात माघारी धाडलं. यादरम्यान मोहम्मद शमीने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा ठरला सातवा गोलंदाज
मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात अनुभवी फलंदाज केएल राहुलला पहिल्याच चेंडूवर बाद करत माघारी धाडलं होतं. आता पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अभिषेक शर्माला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करत माघारी धाडलं. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत पावरप्लेच्या षटकात सर्वाधिक गडी बाद करण्याच्या रेकॉर्डमध्ये जहीर खानला मागे टाकलं आहे. या यादीत मोहम्मद शमी सातव्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावे ७९ गडी बाद करण्याची नोंद आहे.
आयपीएल स्पर्धेत पावरप्लेच्या षटकात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
भुवनेश्वर कुमार -७९ गडी
ट्रेंट बोल्ट – ७२ गडी
दीपक चहर – ६७ गडी
संदीप शर्मा -६२ गडी
उमेश यादव – ५८ गडी
इशांत शर्मा – ५७ गडी
मोहम्मद शमी – ५४ गडी
झहीर खान – ५२ गडी
मोहम्मद शमीची दमदार गोलंदाजी
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर ९ गडी बाद १५६ धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाकडून मोहम्मद शमीने दमदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटक गोलंदाजी केली आणि अवघ्या ९ धावा खर्च करून २ गडी बाद केले.
