Mohammed Shami Half Century: वेगवान गोलंदाजीच्या बळावर संघाला विजय मिळवून देणाऱ्या मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीत स्पर्धेत दमदार अर्धशतकी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्पर्धेतील क्वालिफायर फेरीतील सामना बंगाल विरूद्ध आंध्र प्रदेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात त्याने तोडफोड फलंदाजी करून अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. शमीने १६० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ७ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार खेचले.
मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीसह तुफान फटकेबाजीही करू शकतो, हे त्याने इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यातही दाखवून दिलं होतं. इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. आता पुन्हा एकदा संघाला गरज असताना शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने तुफान फटकेबाजी करून सर्वांचं मन जिंकलं. शमी एकेरी दुहेरी धावा करण्यावर भर देत नाही, तर चौकार मारण्यावर अधिक भर देतो. या डावात त्याने एकूण ३३ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार खेचले.
शमीच्या या दमदार खेळीच्या बळावर बंगाल संघाने ६०० धावांचा आकडा गाठला. शमीने आपल्या ५३ धावांपैकी ४६ धावा या चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने केल्या आहेत. या सामन्यातील पहिल्या डावात फंलदाजी करण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेश संघाने अवघ्या २९५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगालने ६२९ धावांचा भलामोठा डोंगर उभारला.
या डावात बंगालकडून शमी फलंदाजीला येण्याआधी सुदीप कुमारने आंध्र प्रदेश संघातील गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. या डावात त्याच्याकडे त्रिशतकी खेळी करण्याची संधी होती. पण तो २९९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. त्यामुळे त्याचं त्रिशतक अवघ्या एका धावेने हुकलं. सुदीप कुमारने या खेळीदरम्यान ३१ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार खेचले. तर संघातील आणखी एक फलंदाज शाकिर हबीबने देखील ९५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. त्याने ८ चौकार आणि १ षटकार खेचला. त्याचं शतक अवघ्या ५ धावांनी हुकलं.
