Mohammed Shami Single Handed Catch: मोहम्मद शमी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शमीने आपल्या कामगिरीने अनेकांची बोलती बंद केली आहे. पण फिटनेसमुळे त्याला संघात स्थान दिलं जात नाहीये. पण शमीने हार न मानता सातत्याने चांगली कामिगिरी केली आहे. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शमीच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दरम्यान दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. सेमीफायनलमध्ये गोलंदाजी करताना त्याने एक भन्नाट झेल घेतला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. ईस्ट झोन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी इशान किशनकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा खेळाडू वैभव सू्र्यवंशीकडे सोपवण्यात आली आहे. शमीला फिटनेसचं कारण देऊन संघाबाहेर केलं गेलं होतं. पण मुख्य बाब अशी की, शमीने या सामन्यात गोलंदाजी करताना सर्वाधिक षटकं टाकली आहेत.
मोहम्मद शमीचा भन्नाट कॅच
तर झाले असे की, सेंट्रल झोन संघाची फलंदाजी सुरू असताना ईस्ट झोन संघाकडून मोहम्मद शमी ४६ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्यावेळी सेंट्रल झोनकडून हर्ष दुबे फलंदाजी करत होता. शमीने डावखुऱ्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना राऊंड द विकेटने फुल लेंथ चेंडू टाकला. या चेंडूवर हर्ष दुबेने स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण फटका खेळल्यानंतर चेंडू सरळ शमीच्या हातात गेला. शमीनेही आपल्या गोलंदाजीची अॅक्शन पूर्ण होताच ,फॉलो थ्रू मध्ये खाली वाकून एका हाताने भन्नाट झेल घेतला. हा झेल पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले. अंपायरने रिव्ह्ययूमध्ये तपासून पाहिलं आणि त्यानंतर फलंदाज बादची घोषणा करण्यात आली.
या सामन्यात शमीच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने १६ षटकं टाकली. यादरम्यान त्याने ४२ धावा खर्च करून २ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने १ षटकांत ५६ धावा खर्च केले आणि ३ गडी बाद केले. आपल्या दमदार गोलंदाजीच्या बळावर त्याने आपल्या ईस्ट झोन संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.
