आपल्या गोलंदाजी रन-अपमध्ये सुधार करण्याचा सल्ला पाकिस्तानी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय गोलंदाज मोहम्मद शामीला देऊ केला आहे. तसेच शामीमध्ये भारतीय संघासाठी दिर्घकाळ गोलंदाजी करण्याची क्षमता असल्याचेही शोएब म्हणाला.
शोएब म्हणतो की, मोहम्मद शामीला मी उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत पाहतो. शामी प्रतिभावान गोलंदाज आहे त्यामुळे त्याने आपल्या गोलंदाजीबाबतीत तितकीच काळजीही बाळगली पाहिजे. शामीच्या गोलंदाजीच्या तांत्रिक बाबतीत मूलभूत घटकांचा अभाव आहे. धावपट्टीच्या दिशेचा शामीचा गोलंदाजी ‘रन-अप’ सुसंगत नाही. त्यामुळे आगामी काळात याबाबतीत त्याने लक्ष द्यायला हवे असेही शोएब म्हणाला.
शामीच्या गोलंदाजी ‘रन-अप’ बाबतीत अधिक सविस्तरपणे बोलताना शोएब म्हणाला की, शामीच्या गोलंदाजी रन-अपमध्ये सुसंगतपणा आणि सातत्य नाही. धावपट्टीजवळ येताच शामीकडून होणारी कृती गुंतागुंतीची आहे. तशी असू नये. गतीमान गोलंदाजाची कृती(अॅक्शन) साधी आणि सोपी असावी जेणेकरून गोलंदाजीत गती राखता येते. या गोष्टीवर शामीने अभ्यास केल्यास भारतीय संघासाठी उत्तमरित्या दिर्घकाळ गोलंदाजी शामी करू शकतो असेही शोएब म्हणाला.