दुखापतींच्या वेढ्यामुळे चर्चेत असलेल्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाने सराव सामना जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चार षटकार खेचत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने भारतीय संघाला २०७ धावांचं लक्ष्य दिलं होतं. यशस्वी जैस्वालचं अर्धशतक आणि कर्णधार शुबमन गिलच्या ४४ धावांच्या खेळीने या विजयाचा पाया रचला. सिराजने तडाखेबंद षटकारांसह १५ चेंडूत ३२ धावांची खेळी करत दिमाखदार विजय मिळवून दिला.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने पहिल्या डावात ३६३ धावांवर डाव घोषित केला. निशान फर्नांडो (६६), रवींदू रसंथा (७१), सोनल दिनुशा (५२) या तिघांनी अर्धशतकी खेळी केल्या. भारतीय संघातर्फे कुलदीप यादव आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाने देवदत्त पड्डीकलच्या शतकी खेळीच्या बळावर ३५७ धावांची मजल मारली. देवदत्तने १८ चौकारांनिशी नाबाद १४२ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने ६३ तर अकराव्या क्रमांकावर खेळणाऱ्या गुरनूर ब्रारने २ चौकार आणि ४ षटकारांच्या साह्याने ३६ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून रमेश मेंडिस आणि असंका मनोज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने दुसरा डाव २०० धावांवर घोषित केला. निशान फर्नांडोने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. भारताकडून गुरनूर ब्रार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला २०७ धावांचं लक्ष्य मिळालं. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शुबमन गिल पहिल्या डावात खेळला नव्हता. दुसऱ्या डावात त्याने ४४ धावा करत पहिल्या टेस्टसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. श्रीलंकेतील खेळपट्ट्यांचा अंदाज यावा यादृष्टीने भारतीय फलंदाजांनी छोट्या खेळी करून निवृत्त होणं पसंत केलं. सिराजने हात फैलावत फलंदाजीत चमक दाखवली.

भारतीय संघ या दौऱ्यात गॉल आणि कोलंबो इथे टेस्ट खेळणार आहे. दुखापतींमुळे जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, साई सुदर्शन या मालिकेत खेळू शकणार नाहीत. निवडसमितीने या दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार, फिरकीपटू सारांश जैन, आकीब नबी यांना संधी दिली आहे. यांच्यापैकी कोणाला पदार्पणाची संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. पहिली टेस्ट १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.