भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सिडनी कसोटी सामन्यावेळी मैदानावर वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली होती. सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. दरम्यान ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोहम्मद सिराज भारतीय संघासोबत मायदेशी परतला असून यावेळी त्याने या घटनेबद्दल खुलासा केला आहे.

मैदानावरील पंचांनी आम्हाला सामना सोडण्याचा पर्याय दिला होता असा खुलासा मोहम्मद सिराजने पत्रकारांशी बोलताना केला आहे. मात्र यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने सामना सोडण्यास नकार दिला. हैदराबादमध्ये परतल्यानंतर सिराज घरी न जाता थेट दफनभूमीत वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचला होता. यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला.

“जर वर्णद्वेषी शेरेबाजीमुळे तुम्ही नाराज असाल तर सामना सोडून जाऊ शकता असं आम्हाला पंचांनी सांगितलं होतं. पण अजिंक्य रहाणेने यासाठी नकार दिला. आम्ही खेळाचा आदर करतो आणि येथे आम्ही खेळण्यासाठी आलो आहोत…आम्ही का खेळ सोडावा? अशी विचारणा केली,” असा खुलासा मोहम्मद सिराजने केला आहे.

“त्या घटनेने मला अजून मजबूत केलं. मी त्याचा खेळावर काही परिणाम होऊ दिला नाही याचा अभिमान आहे,” असंही सिराजने यावेळी सांगितलं.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळताना सिराजने वर्णद्वेषी शेरेबाजी झाल्याची तक्रार केली होती. सिराजसोबत बुमराहलादेखील टार्गेट करण्यात आलं होतं. हा प्रकार कर्णधार अजिंक्य रहाणेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने याबाबत मैदानावरील पंचांकडे धाव घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात हा प्रकार घडला होता. यानंतर काही वेळासाठी सामना थांबवण्यातही आला होता.