Sarfaraz Khan And Mohammed Siraj Viral Video: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यात मोहम्मद सिराजचा बोलबाला पाहायला मिळाला होता. गोलंदाजीसह फलंदाजीत लागोपाठ ३ षटकार मारुन भारतीय संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला होता. मालिकेतील पहिला सामना सुरु होण्याआधी भारतीय खेळाडू आपल्या लुक्सवर फोकस करताना दिसून आले. भारतीय खेळाडूंचा मस्ती करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यादरम्यान मोहम्मद सिराज आणि सर्फराज खानचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफन चर्चेत आहे.
पहिल्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. यासह भारतीय खेळाडू नव्या लुकसाठी श्रीलंकेतील प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट चतुरंगाच्या सलूनमध्ये पोहोचले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्फराज खान, ऋषभ पंत आणि शुबमन गिल मस्ती करताना दिसून येत आहेत. यादरम्यान मोहम्मद सिराजने असं काही केलं, जे पाहून सर्फराज खान आश्चर्यचकीत झाला. सिराजने सर्फराज खानचे केस कापण्यासाठी ट्रिमर उचलला आणि त्याचे केस कापू लागला. हे पाहून सर्फराज खान चांगलाच घाबरला होता. पण त्यानंतर चतुरंगाने सर्फराजची हेअरस्टाईल व्यवस्थित केली.
दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी सर्फराज खानला संधी
श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी सर्फराज खानला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. या संघात साई सुदर्शनचा समावेश करण्यात आला होता. पण साई सुदर्शन पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी सर्फराज खानला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. साई सुदर्शन संघाबाहेर होण्याच्या चर्चा सुरु असताना, त्याची जागा भरुन काढण्यासाठी शेख रशीद आणि ऋतुराज गायकवाडला संघात स्थान देणार असल्याची देखील चर्चा रंगली होती. पण सर्फराज खान हे नाव सर्वात आघाडीवर होतं.
सराव सामन्यात भारतीय संघाचा बोलबाला
पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्याआधी ७ ते ९ ऑगस्टदरम्यान दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेने ८ गडी बाद ३६३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ६ गडी बाद ३५७ धावा करुन डाव घोषित केला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ गडी बाद २०० धावा करुन भारतीय संघासमोर मोठं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शेवटी मोहम्मद सिराजने लागोपाठ ३ षटकार मारले आणि नाबाद ३२ धावांची खेळी करुन भारतीय संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
