मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचे फलंदाज झटपट तंबूत परतले. सिराजने पहिल्या डावात ६ विकेट्स घेत टीम इंडियाला मोठी आघा़डी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ४०७ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे भारतीय संघाला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. भारताला ही मोठी आघाडी मिळवून देण्यात सिराजने मोठी भूमिका बजावली आहे.
हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी दीडशे धावा करत ३०० धावांची भागादारी रचत भारताला सामन्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते. आकाशदीपने हॅरी ब्रुकची विकेट घेत ही भागीदारी तोडली आणि मग सिराजने त्याच्या मदतीने इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांना झटपट माघारी धाडलं.
मोहम्मद सिराजने दुसऱ्या दिवशी जॅक क्रॉलीला झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. यानंतर तिसऱ्या दिवशी सिराजने दोन चेंडूत २ विकेट घेत भारताला चांगली सुरूवात करून दिली. सिराजने पहिल्यांदा जो रूटला झेलबाद करवत दुसरी विकेट मिळवली. यानंतर संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला कमालीच्या बाऊन्सने गोल्डन डकवर झेलबाद केलंं. यासह त्याच्या ३ विकेट्स पूर्ण झाल्या.
मोहम्मद सिराजने यानंतर ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांना शून्यावर बाद करत सिराजने ६ विकेट्स मिळवले. सिराजने आधी ब्रायडन कार्सला पायचीत केलं. यानंतर जोश टंगला पायचीत केल्याचं अपील केल्यानंतर पंचांनी बाद दिलं नाही. यानंतर रिव्ह्यू घेण्यात आला, तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र सिराजच्या बाजूने लागला आणि त्याला पाचवी विकेट मिळाली. मोहम्मद सिराजची ही पाचवी विकेट होती आणि इंग्लंडमध्ये त्याने पहिला फायफर मिळवला. तर कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा चौथा फायफर होता.
पाच विकेट घेतल्यानंतर सिराजने शोएब बशीरला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला सर्वबाद केलं. यानंतर सिराजने त्याचं स्पेशल Siuuu सेलिब्रेशन केलं आणि चेंडू दाखवत मैदानाबाहेर गेला. बुमराहने त्याला मिठी मारत त्याचं कौतुक केलं. सिराजने या सामन्यात १९.३ षटकं टाकत ७० धावा देत ६ विकेट्स घेतल्या. ज्यात ३ मेडन षटकं टाकली.