आयपीएल २०२६ चा लिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १६ डिसेंबरला आयपीएलच्या आगामी सीझनसाठीचा मिनी लिलाव होणार आहे. यापूर्वीच टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली. आयपीएल संघाने रिलीज केल्यानंतर आता या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

टीम इंडियासाठी विश्वचषक खेळणारा आणि वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझींचा भाग असलेल्या मोहित शर्माने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रामावर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघाचा मुख्य गोलंदाज असलेल्या मोहित शर्माने आता क्रिकेटला अलविदा केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने आगामी सीझनपूर्वी त्याला रिलीज केल्यानंतर मोहित शर्माने हा निर्णय घेतला.

२०२२ च्या आयपीएल हंगामात मोहित शर्मा खेळू शकला नाही, त्यानंतर २०२३ मध्ये गुजरात टायटन्सने मोहितला विकत घेतलं आणि त्याच्या डेथ ओव्हरमध्ये विकेट घेण्याच्या क्षमतेने क्रिकेट जगताला चकित केलं. ३५ वर्षांच्या मोहितने त्या हंगामात २७ विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅपपासून फक्त एक विकेट मागे राहिला. मोहितने त्याची उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आणि २०२४ मध्ये गुजरातसाठी १२ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आणि २०२५ च्या हंगामासाठी दिल्लीने त्याला विकत घेतलं.

मोहित शर्माने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयपीएलमधील डेथ ओव्हर्समध्ये ९.८२ च्या इकोनॉमीने ५७ विकेट्स घेतल्या. २०१५ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी तो भारताच्या संघाचा भाग होता, जिथे तो आठ सामन्यांमध्ये १३ बळी घेत संघाचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

मूळचा हरियाणाचा असलेल्या मोहित शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं, “आज, जड अंतःकरणाने, मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. हरियाणाचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते भारताची जर्सी घालण्यापर्यंत आणि आयपीएलमध्ये खेळण्यापर्यंत, हा प्रवास एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नव्हता.”

“माझ्या कारकिर्दीचा कणा राहिल्याबद्दल हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे खूप खूप आभार आणि अनिरुद्ध सरांचेही मनापासून आभार, ज्यांनी सतत मार्गदर्शन केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशा पद्धतीने मला घडवलं. बीसीसीआय, माझे प्रशिक्षक, माझे सहकारी, आयपीएल फ्रँचायझी, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सर्व मित्रांचे त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार,” असं पुढे मोहित शर्माने लिहिलं.

“माझ्या पत्नीचे विशेष आभार, जिने नेहमीच माझे मूड स्विंग आणि माझा राग योग्य पद्धतीने हाताळला. प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली. मी खेळासाठी नवीन पद्धतीने माझं योगदान देण्यासाठी उत्सुक आहे,” असं अखेरीस मोहित शर्माने लिहिलं.