पाकिस्तानचा मोहम्मद आमीर पुढच्या वर्षीच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये विदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. आमीरने इंग्लंडचं नागरिकत्व घेतलं आहे. विस्डेनच्या द स्कूप कार्यक्रमात आमिरने इंग्लंडचं नागरिकत्व घेतल्याचं स्पष्ट केलं. यामुळे पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्थानिक अर्थात पाकिस्तानचा खेळाडू म्हणून तो खेळू शकणार नाही.त्यामुळे यापुढे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत विदेशी खेळाडू म्हणून खेळणार असल्याचं त्याने सांगितलं.
पाकिस्तानऐवजी इंग्लंडचा खेळाडू झाल्याने आमिर आता आयपीएल स्पर्धेत खेळू शकतो. उमेदीच्या काळात आमिरचा सामना करणं भारतीय फलंदाजांना कठीण जात असे. आयपीएल संघ त्याला ताफ्यात सामील करणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. स्पॉटफिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने आमिरवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. मात्र काही वर्षांनंतर बंदीचा कालावधी कमी करण्यात आला. ३४वर्षीय आमीरने ३६ टेस्ट, ६१ वनडे आणि ६२ टी२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत बंदी आहे. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात पाकिस्तानचे खेळाडू सहभागी झाले होते. मात्र त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईवर दहशतवादी झाला. या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानचे असल्याचं उघड झालं. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग कायमस्वरुपी बंद झाला. अनेकदा यासंदर्भात चर्चा झाली मात्र बीसीसीआय तसंच आयपीएल प्रशासनाने कधीही भूमिका बदलली नाही. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू २०१२-१३ मध्ये अझर मेहमूद आयपीएलमधल्या पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. अझरने इंग्लंडचं नागरिकत्व घेतलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा आहे हा मुद्दा निकाली निघाला.
२०२६च्या उर्वरित हंगामासाठी इंग्लंडमधील काऊंटी संघ नॉटिंघमशायर संघाने आमिरला करारबद्ध केलं. इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारल्यामुळे आमिर आता नॉटिंघमशायर संघाचा स्थानिक खेळाडू असेल असं संघाने स्पष्ट केलं. आमिरकडे इंग्लंडचा पासपोर्ट असल्याने त्याच्या नावामागे लागणारा विदेशी टॅग नसेल असं नॉटिंघमशायरने सांगितलं. काही दिवसांपूर्वीच झालेल्या द हंड्रेड स्पर्धेत आमीर डेव्हिड पायनेच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत विदेशी ठरणार असला तरी इंग्लंड क्रिकेटमध्ये आमीर आता स्थानिक खेळाडू आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत आमिर रावळपिंडी संघासाठी खेळतो. ५.४ कोटी एवढं त्याचं मानधन आहे. आमीर आता विदेशी खेळाडू झाला आहे. अंतिम अकरात किती विदेशी खेळाडू खेळणार यासंदर्भात नियम आहेत. आमीरला रिटेन करायचं की नाही यासंदर्भात रावळपिंडी संघाला निर्णय घ्यावा लागेल.
