भारत-पाकिस्तान दुरावलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी बैठकीच्या निमित्ताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी भारतात येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. नक्वी भारतात आल्यास भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध सुधारू शकतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलची फायनल आहे. याच कालावधीत आयसीसीच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दोन पातळ्यांवर होणार आहे. २१ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने बैठक होणार आहे तर ३० आणि ३१ मे रोजी प्रत्यक्ष बैठक होणार आहे. मूळ कार्यक्रमानुसार ही बैठक दोहा इथे होणार होती मात्र मध्यपूर्वेतील संवेदनशील परिस्थितीमुळे आता अहमदाबाद इथे होणार आहे.
दोहाऐवजी अहमदाबाद इथे बैठक होणार असल्यामुळे नक्वी यांच्यासाठी सहभागी होणं कळीचा मुद्दा ठरणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन म्हणून ते या बैठकीला उपस्थित असणं स्वाभाविक आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला भारताने दिलेलं ऑपरेशनस सिंदूर हे प्रत्युत्तर यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावले आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांनाही याचा फटका बसला. आयसीसीच्या बैठकीच्या तारखा नक्वी यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. अहमदाबाद इथे आयपीएलची फायनल होणार आहे. तिथेच आयसीसीची बैठक होणार आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वातील पदाधिकारी, माजी खेळाडूंचा ताफा शहरात असणार आहे. जिओ सुपर या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमाने दिलेल्या बातमीनुसार मोहसीन नक्वी यांना आयपीएल फायनलसाठी येण्याचं आमंत्रण मिळालं आहे. मात्र याला अधिकृत पातळीवर कोणीही दुजोरा दिलेला नाही. बीसीसीआय किंवा आयपीएल प्रशासनानेही यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन भारतात दाखल झाल्यास वादाला तोंड फुटू शकतं याची कल्पना असल्यामुळे यासंदर्भात तूर्तास तरी कोणत्याही प्रकारची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
नक्वी हे केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून येणार असते तर या भेटीला एवढं महत्त्व प्राप्त झालं नसतं. पण नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत आणि त्याचबरोबरीने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. आशिया चषक स्पर्धेवेळी निर्माण झालेल्या वादाची या भेटीला पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला भारतीय संघ आशिया चषकावर बहिष्कार टाकणार असं चित्र होतं. मात्र भारताने स्पर्धेतून माघार घेतल्यास आर्थिक डोलारा कोसळू शकतो हे लक्षात घेऊन बीसीसीआयने स्पर्धेसाठी संघ पाठवला. स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना होणार का याविषयी साशंकता होती मात्र चर्चा आणि वाटाघाटींनंतर हा सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं. टॉसवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. याप्रकाराने नक्वी संतापले. त्यांनी याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. स्पर्धेतल्या पुढच्या सामन्यातही हस्तांदोलन झाले नाही.
फायनलमध्ये पाकिस्तानला नमवत आशिया चषकाच्या जेतेपदावर भारतीय संघाने नाव कोरलं. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख या नात्याने त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला करंडक मिळणं अपेक्षित होतं. मात्र भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते करंडक स्वीकारण्यास नकार दिला. अन्य मान्यवरांच्या हस्ते करंडक देण्याची विनंती नक्वी यांना करण्यात आली. मात्र त्यांनी ती मान्य केली नाही. नक्वी यांच्या हस्ते करंडक स्वीकारणार नाही यावर भारतीय संघव्यवस्थापन ठाम राहिलं. फायनल संपल्यानंतर जवळपास दीड ते दोन तास हा गोंधळ सुरू होता. नक्वी आशिया चषकाच्या करंडकासह निघून गेले. विजेता संघ असूनही भारताला करंडक मिळालाच नाही. त्यानंतर भारतीय संघ जेतेपदाविनाच मायदेशी परतला. तो जेतेपदाचा करंडक आणि खेळाडूंना देण्यात येणारी पदकं हे सगळं आशियाई क्रिकेट परिषदेच्या नक्वी यांच्या कार्यालयात कुलुपबंद आहे. अद्यापही भारतीय संघाला हा करंडक मिळालेला नाही. माझ्याव्यतिरिक्त कोणाच्याही हस्ते हा करंडक देण्यात येणार नाही अशा सूचना नक्वी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
हा जेतेपदाचा करंडक मिळावा अशी मागणी बीसीसीआयने आयसीसीकडे केली आहे. आयसीसीकडे हे प्रकरण प्रलंबित आहे. यावरून बीसीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात बेबनाव सुरू आहे. आशिया चषकाच्या गोंधळानंतर नक्वी यांनी केलेलं एक वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. पाकिस्तान सुपर लीग ही आयपीएलला लवकरच मागे टाकेल असं विधान नक्वी यांनी केलं होतं. त्यावरून भारतीय चाहत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. आयसीसीच्या कार्यकारिणीची बैठक दरवर्षीप्रमाणे होते. पण ती भारतात होणं आणि नक्वी उपस्थित राहणं या दोन मुद्यांमुळे त्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. नक्वी स्वत: भारतात येणार का व्हर्च्युअल पद्धतीनेच बैठकीला उपस्थित राहणार का पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे अन्य पदाधिकारी बैठकीला हजर राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी नक्वी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती. क्रिकेट व्यवस्थापनातील कोणताही अनुभव नसतानाही त्यांना हे पद देण्यात आले होते. पुढे आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. प्रशासकीय आणि कॉर्पोरेट पार्श्वभूमीमुळे मोहसीन यांच्याकडे पाकिस्तानमध्ये प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते. २८ ऑक्टोबर १९७८ रोजी लाहोरमध्ये जन्मलेल्या नक्वी यांनी गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटी येथून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्याशिवाय अमेरिकेतून त्यांनी मीडिया सायन्सेन या विषयात पदवी मिळवली आहे. सुरुवातीला मोहसीन यांनी ‘सीएएन’मध्ये प्रोड्यूसर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी सिटी मीडिया ग्रुपची स्थापना करून पाकिस्तानमध्ये सहा वृत्तवाहिन्या आणि एक वृत्तपत्र सुरू केले. २२ जानेवारी २०२४ रोजी मोहसीन यांच्याकडे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर ते आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुखही झाले.
दरम्यान नक्वी यांच्या नेतृत्वात काम करणं निव्वळ अशक्य आहे अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एप्रिल २०२४ मध्ये गॅरी कर्स्टन यांची पाकिस्तानचे वनडे आणि टी२० प्रकाराचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा होता. मात्र असं असतानाही त्यांनी अवघ्या सहा महिन्यात राजीनामा दिला होता. पाकिस्तान क्रिकेटमधलं वातावरण विखारी आहे. प्रत्येक कामात हस्तक्षेप केला जातो. व्यावसायिकतेचा अगदीच अभाव आहे. मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वात काम करणं आणि संघाला जिंकून देणं जवळपास अशक्य होतं’ असं कर्स्टन म्हणाले होते.
