Mohsin Naqvi Persuaded Bangladesh To Not Travel To India: टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वी बांगलादेश संघाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत भारतात सामने खेळण्यासाठी जाण्यास बांगलादेशने सातत्याने नकार दिल्यामुळे त्यांना टी२० वर्ल्ड कप २०२६ मधून वगळण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सुरक्षिततेबाबत वारंवार हमी दिली होती, मात्र बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. यानंतर आता बीसीसीच्या माजी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे.
बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातून मुस्तफिझुर रहमान याला वगळण्यास सांगितल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तान हा एकमेव आयसीसी सदस्य देश होता ज्याने त्यांना पाठिंबा दर्शवला. पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याची धमकी देत वाद निर्माण केला, मात्र नंतर त्यांनी यू-टर्न घेतला आणि सामना खेळला.
दरम्यान, माजी बीसीबी सरचिटणीस आणि एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद अशरफुल हक यांनी बांगलादेशच्या सध्याच्या परिस्थितीसाठी मोहसिन नक्वी यांना जबाबदार धरलं आहे. रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना अशरफुल हक म्हणाले की, सध्याचे बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम अनुभवहीन असून ते मोहसीन नक्वी यांच्या प्रभावाखाली आले. नक्वी यांनी त्यांना भारत दौरा न करण्याची घोषणा करण्यास प्रवृत्त केलं, असा आरोपही त्यांनी केला.
मोहसीन नक्वींनी बांगलादेश बोर्डाला भारतात न जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा मोठा आरोप
“क्रिकेट प्रशासक म्हणून मी प्रामाणिकपणा आणि बांधिलकीला महत्त्व देतो. अमिनुल इस्लाम कदाचित अनुभवहीन असल्यामुळे सध्याचे ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या प्रभावाखाली आले आणि त्यांनी त्यांना या निर्णयाला सहमती द्यायला प्रवृत्त केलं. शेवटी फायदा कुणाचा झाला?” असे माजी बीसीबी सरचिटणीस सय्यद अशरफुल हक यांनी मत व्यक्त केलं.
अशरफुल हक यांनी बांगलादेश सरकारचा निर्णय घाईघाईत घेतलेला असल्याची टीकाही केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, भारताने सप्टेंबरमध्ये बांगलादेश दौरा केला नाही तर देशातील क्रिकेट पाच ते दहा वर्षे मागे जाऊ शकते.
“मी सुरुवातीपासूनच माझी भूमिका स्पष्ट केली होती. त्या वेळी बांगलादेश सरकारने, विशेषत: तत्कालीन क्रीडा सल्लागारांनी घेतलेला निर्णय हा अकाली आणि अविचारी होता, असे मला वाटत होते. भारतातील आयपीएलमध्ये मुस्तफिझुर रहमानला खेळण्याची परवानगी न दिल्यामुळे एवढा कठोर निर्णय घेण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते.”
“भारताने दौरा केला नाही तर बांगलादेश क्रिकेट ५ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ मागे जाऊ शकते. हा दौरा घडवून आणणे ही सध्याच्या सरकारची जबाबदारी आहे. या नातेसंबंधाचे महत्त्व त्यांनी ओळखले पाहिजे. भारतीय प्रसारमाध्यमांनी ऐतिहासिकदृष्ट्या आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि यावेळीही तेच होईल, अशी मला आशा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
