Mohsin Naqvi: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तान संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. सलमान अली आघाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानला सुपर ८ फेरीतून बाहेर पडावं लागलं आहे. पाकिस्तानचा सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना श्रीलंकेविरूद्ध पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने २१२ धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी श्रीलंकेला १४८ धावांवर रोखणं गरजेचं होतं. पण पाकिस्तानचा संघ तसं करू शकलेला नाही. दासून शनाकाच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने २०० धावांचा पल्ला गाठला. पाकिस्तानने हा सामना ५ धावांनी जिंकला, पण पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तानच्या या कामगिरीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोहसीन नक्वी अॅक्शन मोडमध्ये

पाकिस्तानला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मोहसीन नक्वी यांना आश्वासन देण्यात आलं होतं की,पाकिस्तानचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करेल. पण पाकिस्तानचा संघ असं करू शकलेला नाही. एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मोहसीन नक्वी प्रचंड संतापले आहेत. कारण त्यांना टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांनी पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करेल असं आश्वासन दिलं होतं. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, “सलमान, बाबर आझम, उस्मान खान आणि काही खेळाडूंचा शेवट हा टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेनंतर होऊ शकतो.”

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा आणि संघातील प्रमुख फलंदाज बाबर आझम हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या महत्वाच्या सामन्यात बाबर आझमला विश्रांती देण्यात आली होती. सुत्राने पुढे सांगितले की, माईक हेसन यांनी मोहसीन नक्वींना काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. तसेच युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचा सल्ला दिला आहे.

सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी गमावली

साखळी फेरीतील सामन्यांमध्ये पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. त्यानंतर सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसला. न्यूझीलंडविरूद्ध होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता. त्यानंतर पुढील सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यातही पाकिस्तानकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी होती. पाकिस्तानला हा सामना ६५ धावांच्या फरकाने जिंकायचा होता. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यामुळे श्रीलंकेला १४७ धावांवर रोखणं गरजेचं होतं. पण दासून शनाकाने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि श्रीलंकेला विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण पाकिस्तानने हा सामना अवघ्या ५ धावांनी आपल्या नावावर केला.