ऑस्ट्रेलियासाठी ४ टेस्ट, १६ वनडे आणि २४ टी२० खेळणाऱ्या अष्टपैलू मॉइझेस हेन्रिकेने आता पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ३९वर्षीय मॉइझेसने ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता.

टी२० वर्ल्डकपसाठी पात्र होण्यासाठी पोर्तुगालचा संघ प्रयत्नशील आहे. मॉइझेसच्या समावेशाने पोर्तुगालच्या संघाला बळकटी मिळाली आहे. मॉइझेसचा जन्म पोर्तुगालमधल्या मडेरा नावाच्या बेटावर झाला होता. याच ठिकाणी ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही जन्म झाला आहे. मॉइझेस लहान असताना त्याच्या घरचे ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. न्यू साऊथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्स संघासाठी मॉइझेस अनेक वर्ष खेळला. ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारात खेळण्याचीही त्याला संधी मिळाली. मॉइझेसने भारतात टेस्ट पदार्पण केलं होतं. पर्दापणाच्या लढतीत मॉइझेसने दोन्ही डावात (६८ आणि ८१) अर्धशतकी खेळी साकारली होती.

ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी मॉइझेस युरोपियन टी२० प्रीमिअर लीग स्पर्धेत ग्लासगो कॉस्मिक संघासाठी खेळणार आहे. पोर्तुगालने मॉइझेसची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. आयसीसीच्या टी२० क्रमवारीत पोर्तुगालचा संघ ३७व्या स्थानी आहे. पोर्तुगालची लढत इस्रायल, जर्मनी, ग्रीस आणि चेक या देशांशी होणार आहे. यामध्ये जो संघ जिंकेल त्यांचा मुकाबला स्कॉटलंड, जर्सी आणि डेन्मार्क यांच्याशी युरोपियन रिजनल फायनलमध्ये होणार आहे.

पोर्तुगालच्या संघात न्यूझीलंडमध्ये डोमेस्टिक क्रिकेट खेळणारा क्रेग काचोपा तसंच दक्षिण आफ्रिका अ संघाकडून खेळलेले कॅमेरुन श्लेकटन, सेबॅस्टियन डी ऑलिव्हरा यांचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये जन्म झालेला सिराज उल्ला खादीम हाही पोर्तुगालच्या संघात असणार आहे.