Shreyas Iyer Playing Cricket With Mother: भारतीय संघातील स्टार फलंदाज आणि पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या रेस्ट मोडमध्ये आहे. त्यामुळे त्याला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान तो आपल्या घरात आईसोबत क्रिकेट खेळताना दिसून आला आहे. ज्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
क्रिकेटपटूला क्रिकेट खेळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. बाहेर पावसाळा सुरू आहे. श्रेयस सध्या आंतरराष्ट्रीय संघाचा भाग नाही. त्यामुळे त्याने घरीच आपल्या आईसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. हा व्हीडिओ पंजाब किंग्जच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओ अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रेयस अय्यर आपल्या घरातील पॅसेजमध्ये क्रिकेट खेळत आहे. त्याची आई त्याला गोलंदाजी करत आहे. दरम्यान आपल्या आईच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला. श्रेयसला बाद केल्यानंतर, त्याच्या आईंनी दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भल्या भल्या गोलंदाजांना श्रेयस अय्यरला बाद करताना घाम फुटतो. पण आपल्या आईंनी टाकलेल्या चेंडूवर श्रेयस अय्यरची बत्ती गुल झाली. आधी यॉर्कर मग बाऊंसर आणि त्यानंतर तो क्लीन बोल्ड झाला. या व्हीडिओवर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. श्रेयसला वगळल्यानंतर, जोरदार चर्चा रंगली होती. मात्र,मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं होतं की, या संघात त्याची जागा बनत नव्हती. त्यामुळे त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. या मालिकेआधी झालेल्या आयपीएल २०२५ स्पर्धेत त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्याने पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. यादरम्यान त्याने धावा देखील केल्या होत्या. मात्र ,अंतिम सामन्यात पंजाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमध्येही धावांचा पाऊस पाडला आहे.