Monty Panesar On Shubman Gill: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी संघाची घोषणा होण्यापूर्वी शुबमन गिल हा भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार होता. पण या संघाची घोषणा झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण गिलला उपकर्णधारपदावरून काढण्यात आलं आणि त्याला संघाबाहेर करण्यात आलं. गिल अजूनही वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कायम आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही जबाबदारी गिलकडे सोपवण्यात आली होती. पण गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. गिलची तुलना अनेकदा विराटसोबत केली गेली आहे. पण मॉँटी पानेसरने या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत.

आता इंग्लंडचा माजी खेळाडू माँटी पानेसरने शुबमन गिलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत माँटी पानेसर म्हणाला, “विराट कोहलीची तीव्रता आणि आक्रमकता स्पष्टपणे दिसून येते, पण शुभमन गिल तसे करू शकत नाही. तो एक निष्काळजी क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, पण खेळताना तो अचानक आळशी शॉट्स खेळू लागतो. विराटची तीव्रता सर्व फॉरमॅटमध्ये जाणवते, पण शुभमनला ते जमणार नाही. हे त्याच्यावर खूप मोठं ओझं आहे. तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार होऊ शकत नाही, कारण हे त्याच्यासाठी झेपण्यापलीकडचे आहे.”

शुबमन गिल हा भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. तर टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही गिलकडे होती. पण त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे. ज्यावेळी गिलकडे वनडे आणि कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली, त्यावेळी असा अंदाज वर्तवला जात होता, की गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनू शकतो.

तर भारतीय संघाची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडे सोपवण्यात आली आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला संघर्ष करावा लागला आहे. एकाच वर्षात भारतीय संघाला २ वेळा व्हॉईटवॉशचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने भारतीय संघावर ३-० ने तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर २-० ने विजय मिळवला होता. त्यामुळे गौतम गंभीरवरही जोरदार टीका केली जात आहे.

गौतम गंभीरबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना माँटी पानेसर म्हणाला, “गंभीर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील उत्तम प्रशिक्षक आहे. कारण या फॉरमॅटमध्ये त्याने भरपूर यश मिळवलं आहे. गंभीर रणजी ट्रॉफी संघाचा प्रशिक्षक बनू शकतो. रेड बॉल क्रिकेटसाठी संघबांधणी कशी करायची, याबाबत त्याने रणजी प्रशिक्षकांसोबत चर्चा करायला हवी.”