कॉमनवेल्थ गेम्स ग्लासगो, स्कॉटलंड इथे काही दिवसात सुरू होत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धा भारतासाठी नेहमीच भरघोस पदकांची अशी राहिली आहे. यंदा मात्र कॉस्टकटिंगमुळे पदकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. १२५ खेळाडूंच्या खेळाडूंचं पथक रवाना झालं आहे. ऑलिम्पिकच्या धर्तीवर होणाऱ्या कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय नेहमीच भरघोस मदत करतं. यंदाही कॉमनवेल्थला जाणाऱ्या पथकाच्या तयारीसाठी सरकारने ५० कोटींहून अधिक पैसे खर्च केले आहेत.
अॅथलेटिक्स आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये पदकाची सर्वाधिक आशा असल्याने तयारीसाठी खर्च करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी मोठा वाटा या खेळांना मिळाला आहे. ३२ सदस्यीय अॅथलेटिक्स चमूच्या तयारीसाठी २० कोटींहून अधिक पैसे मुक्रर करण्यात आले आहेत. अॅथलेटिक्सपटूंनी विदेशातल्या अद्ययावत अशा केंद्रांमध्ये सराव केला. यामध्ये अमेरिकेतल्या कोलोरॅडो स्प्रिंग्ज हाय अल्टिट्यू़ड ट्रेनिंग सेंटरचा तसंच स्वित्झर्लंड, टर्की आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सराव सत्रांचाही समावेश आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय ग्लासगोला जाणार असून तिथे गेल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. चार वर्षानंतर कॉमनवेल्थ स्पर्धा भारतात होणार आहे. क्लोजिंग सेरेमनीत स्पर्धेची मशाल भारताकडे सोपवण्यात येईल. भारतात होणाऱ्या स्पर्धेत १७ खेळ असतील असं क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
बर्मिंगहॅम झालेल्या स्पर्धेपेक्षा यंदा जास्त पदकं मिळतील असं टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. जोहल यांनी सांगितलं. जोहल सरकारच्या मिशन ऑलिम्पिक सेलचेही प्रमुख आहेत.
१४ सदस्यीय बॉक्सिंग चमूच्या तयारीसाठी सरकारने १० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. बॉक्सिंग पथकात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लोव्हलिना बॉरघाईनचा समावेश असून तिच्याकडून पदकाच्या आशा आहेत. ऑलिम्पिक रौप्यपदकप्राप्त मीराबाई चानूचा समावेश असलेल्या वेटलिफ्टिंग चमूसाठी ७.५ कोटी देण्यात आले आहेत. १२ वेटलिफ्टिंगपटूंचा चमू ग्लासगोसारखंच वातावरण असलेल्या बर्मिंगहॅम इथे सराव करत आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धा ग्लासगोत आहे. ग्लासगो शहराप्रमाणे वातावरण आहे अशा युरोपातील विविध केंद्रांमध्ये भारतीय खेळाडू सराव करत आहेत असं क्रीडामंत्र्यांनी सांगितलं.
