Morne Morkel Team India New Bowling Coach : भारतीय क्रिकेट संघात सध्या बरेच बदल पाहायला मिळत आहेत. राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास संपूर्ण स्टाफच बदलला आहे. आता भारताला नवा गोलंदाजी प्रशिक्षकही मिळाल्याचे समोर आले आहे. तथापि, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे, जी लवकरच होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल आता भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तो धुरा सांभाळेल, असे मानले जात आहे.

मॉर्ने मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार –

गौतम गंभीर नुकताच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. यानंतर अभिषेक नायरकडे फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आता मॉर्ने मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. राहुल द्रविडच्या काळातही टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते, तरीही ते आपली जबाबदारी पार पाडत राहतील.

म्हणजेच भारतीय संघाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. टीम इंडिया सध्या विश्रांतीवर असून बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये पूर्णपणे नवीन कोचिंग स्टाफ दिसू शकतो. क्रिकबझच्या अहवालात असे म्हटले आहे की बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील मोर्ने मॉर्केलच्या नावाची पुष्टी केली आहे. मॉर्ने मॉर्केल यांचा कार्यकाळ १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ८०,००० रुपयांसाठी आयपीएल २०२४ संबंधित विचारला ‘हा’ प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

मॉर्ने मॉर्केल पाकिस्तानचा प्रशिक्षकही राहिला आहे –

मॉर्ने मॉर्केलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपदाचा मोठा अनुभव आहे. याआधी त्यांनी पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. याआधीही मॉर्ने मॉर्केल टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असेल अशी शक्यता वर्तवली जात होती, आता याची पुष्टी झाली आहे.

हेही वाचा – Buchi Babu Tournament : बुची बाबू स्पर्धा कोणाच्या नावावरून सुरू झाली? काय आहे त्यांचं योगदान? यंदा सूर्या-इशान-श्रेयस या स्पर्धेत खेळणार

मॉर्ने मॉर्केलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

मॉर्ने मॉर्केलची कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ८६ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३०९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ११७ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर १८८ विकेट्स आहेत. टी-२० इंटरनॅशनलबद्दल बोलायचे तर त्याने ४४ सामन्यात ४७ विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच त्याने आपल्या कारकिर्दीत दमदार गोलंदाजी केली आहे, आता भारतीय संघाचे गोलंदाज त्याच्या अनुभवाचा फायदा घेऊ शकतील.